मुंबईतील वनसंपदेचा जागतिक पातळीवर डंका ;जागतिक वृक्षनगरी सलग दुसऱ्यांदा मुंबईला बहुमान

उद्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची चित्रफीत वॉशिंग्टनमध्ये प्रसारित करण्यात आली.
मुंबईतील वनसंपदेचा जागतिक पातळीवर डंका 
;जागतिक वृक्षनगरी सलग दुसऱ्यांदा मुंबईला बहुमान

मुंबई : झाडांचे संगोपन, झाडांचे व्यवस्थापनासाठी नियम निश्चिती, वृक्ष संवर्धन व नागरी वनीकरण यामुळे मुंबई पर्यावरणस्नेही आणि हिरवळीने बहरली आहे. मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची जागतिक पातळीवर चर्चा झाली असून, वृक्षनगरी म्हणून मुंबईला सलग दुसऱ्यांदा बहुमान मिळाला आहे. तसेच उद्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांची चित्रफीत वॉशिंग्टनमध्ये प्रसारित करण्यात आली.

अमेरिकेतील वॉशिंग्टन डिसी येथे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ दरम्यान पार पडलेल्या शहरी वनसंपदेवर आधारित दुसऱ्या जागतिक परिषदेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांविषयी दृकश्राव्यफित दाखविण्यात आली. या परिषदेत मुंबईतील वनसंपदेची जागतिक पातळीवर चर्चा झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील वृक्षसंपदा वाढीसाठी हाती घेतलेल्या विविध योजनांचे देखील मान्यवरांनी कौतुक झाले.

मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर याआधीच जागतिक मोहोर उमटली आहे. “जागतिक वृक्ष नगरी २०२१ आणि २०२२" या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता वॉशिंग्टन डिसी येथे १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान शहरी वनसंपदेवर आधारित पार पडलेल्या दुसऱ्या जागतिक परिषदेत मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धनाचे कौतुक झाले आहे.

प्रतिक्रिया

बृहन्मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक त्याचप्रमाणे वृक्ष प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष डॉ. इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, उप आयुक्त (उद्याने) किशोर गांधी यांच्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मागील दोन वर्षात विविध उपक्रम राबवून वृक्ष संवर्धन व नागरी वनीकरण यास चालना दिली आहे. या योगदानामुळे मुंबईला हा सन्मान मिळाला आहे.

- जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

मुंबई वृक्ष समृद्ध

झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्षउत्सव आयोजित करणे, आदी बाबतीतही पालिकेचा उद्यान विभाग सतत आघाडीवर आहे. मुंबईतील वृक्षांची योग्य देखभाल, नवीन वृक्ष लागवडीसाठी सातत्य, नागरी वनांची व्यापक अंमलबजावणी अशा प्रयत्नांमुळेच मुंबई नगरी वृक्ष समृद्ध आहे, हे या परिषदेच्या माध्यतातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. भविष्यातही मुंबई अधिकाधिक पर्यावरणस्नेही आणि हिरवळीने बहरलेले राखता येईल, यासाठी अधिक जोमाने कामकाज करण्याची प्रेरणा यातून मिळाल्याचे देखील परदेशी यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in