
देवश्री भुजबळ/मुंबई
ऐन फेब्रुवारीत मुंबईत उन्हाच्या झळा सुरू झाल्या आहेत. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३४.३ अंश नोंदवले गेले. हे तापमान सरासरी तापमानापेक्षा ३.४ अंशाने अधिक आहे. तर किमान तापमान २० अंश राहिले. हे तापमान सरासरीपेक्षा २.८ अंशाने अधिक होते.
भारतीय हवामान खात्याच्या हवामान अहवालानुसार, मुंबई शहर व उपनगरात पुढील ४८ तास कमाल व किमान तापमान ३५ व १९ अंश राहणार आहे. तर आकाश निरभ्र राहील.
यंदाचा फेब्रुवारी महिना अतिशय उष्ण राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला. सध्या शहरात हिवाळा ते उन्हाळा असे बदल होत आहेत. येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान ३५ अंशाच्या आसपास राहिल. तर बुधवारनंतर शहरातील तापमान कमी झाल्याचे जाणवेल. वाऱ्याची पद्धत बदलल्याने तापमान वाढणे आणि घसरणे सुरूच राहील. मात्र, फेब्रुवारीत एकूण तापमान सामान्यपेक्षा जास्त असेल, असे भारतीय हवामान खात्याचे मुंबईचे संचालक सुनील कांबळे यांनी सांगितले.
हवेचा दर्जा साधारण
मुंबईतील हवेचा निर्देशांक रविवारी साधारण होता. अनेक विभागात हवेचा निर्देशांक १५० पेक्षा अधिक नोंदवला गेला. मालाड - २१२, माझगाव - १८८, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय टर्मिनस - १६६, नेव्ही नगर, कुलाबा - १६४, बोरिवली (पू.) - १६२, सिद्धार्थ नगर, वरळी - १५८, बीकेसी - १५० एक्यूआय होता.
दरम्यान, मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत किमान तापमानाचा पारा अजूनही कमी आहे. मात्र, कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. त्यामुळे ही उन्हाळ्याची चाहूल आहे. येत्या एक दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा येथे तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ अपेक्षित असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जानेवारी ठरला उष्ण महिना
जानेवारी २०२५ हा महिना मुंबईत तिसऱ्यांदा उष्ण महिना ठरला. संपूर्ण महिनाभर तापमान सरासरी ३३ अंश राहिले. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३६ अंश नोंदवण्यात आले. यंदाचा फेब्रुवारीही उष्ण राहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या मुंबई कार्यालयानुसार, फेब्रुवारीतील कमाल तापमान ३७.५ अंश नोंदवले गेले आहे.