मुंबईवर पाणी संकट: धरणांतील जलसाठ्यात वेगाने घट; उपलब्ध पाणीसाठा फक्त....

वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे वेगाने घट होत आहे.
मुंबईवर पाणी संकट: धरणांतील जलसाठ्यात वेगाने घट; उपलब्ध पाणीसाठा फक्त....

मुंबई : वाढत्या उकाड्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याच्या पातळीत बाष्पीभवनामुळे वेगाने घट होत आहे. तसेच १२० किमी अंतरावरुन मुंबईला पाणी वाहून आणताना होणारी पाण्याची नासाडी, पाणीगळती यामुळे ३४ टक्के पाणी वाया जाते. २२ मे रोजी सातही धरणात १ लाख ५४ हजार ४७१ अर्थात फक्त १०.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ६.२४ टक्के पाणीसाठा अपुरा आहे. मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. हा पाणीसाठा जुलै मध्यापर्यंत मुंबईची तहान भागेल इतका आहे. त्यात जून महिन्यात पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होईल.

दरम्यान, मान्सूनसंबंधी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील चार ते पाच दिवसांत पाणीकपातीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. गेल्या जून महिन्यात पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईकरांना जुलै अखेरपासून १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावल्याने मुंबईतील पाणीकपात रद्द करण्यात आली होती.

यंदा सातही धरणात १०.६७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असून राज्य सरकारने २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केल्याने जुलै मध्यापर्यंत मुंबईची तहान भागेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, जून महिन्यात वरुणराजाचे आगमन झाले नाही, तर मुंबईत पाणीबाणीची परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे पाण्याचे योग्य ते नियोजन करण्यात येत असून मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाने केले आहे.

२२ मे रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा - ३९,३०१.७३

  • मोडक सागर - २३,९५३१८.५८

  • तानसा - ४२,७५८२९.४७

  • मध्य वैतरणा - २१,४८७११.१०

  • भातसा - ५३,१०६७.४१

  • विहार - ६७,३२२४.३०

  • तुळशी - २५,०५३१.१३

तीन वर्षांतील २२ मे रोजीचा पाणीसाठा

  • सन २०२२ मध्ये तलावांत ३ लाख ३९ हजार ५३ दशलक्ष लिटर म्हणजे २१ टक्के पाणी उपलब्ध होते.

  • २०२३ मध्ये २ लाख ३७ हजार ७२९ दशलक्ष लिटर म्हणजे १६.४३ टक्के पाणी शिल्लक होते.

  • २०२४ मध्ये १ लाख ५४ हजार ४७१ दशलक्ष लिटर म्हणजे १०.६७ टक्के पाणी उपलब्ध आहे.

अहवालानंतर निर्णय!

दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर पालिकेच्या जल विभागाला आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून गुरूवारी किंवा शुक्रवारी मान्सूनचा अहवाल प्राप्त होणार आहे. त्यात यंदाची पावसाची स्थिती काय आहे हे समजून घेऊन पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाईल. याबाबतचा अंतिम निर्णय पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी चर्चा करून घेण्यात येईल, अशी माहिती जल खात्याकडून देण्यात आली आहे.

जुलै मध्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

यावर्षी पाणीसाठा खालावल्यामुळे पालिकेला राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा धरणातून ९३ हजार ५०० मिलियन लिटर व भातसा धरणातून १ लाख ३७ हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठा मिळाला आहे. तर मुंबई महापालिकेकडे १ लाख ५४ हजार ४७१ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून जुलै मध्यापर्यंत तो मुंबईची तहान भागवेल इतका आहे. मात्र, वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला असून जून महिन्यात वरुणराजाचे आगमन झाले नाही, तर मात्र मुंबईत जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in