मुंबई : 'या' रेल्वे स्थानकात मुंबईतील सर्वात रुंद पादचारी पूल, लोकलसह मेट्रो प्रवाशांचाही त्रास होणार कमी

मेट्रोमुळे अंधेरी, घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ही गर्दी लक्षात घेऊन घाटकोपर रेल्वे स्थानकात सर्वात रुंद पादचारी पूल बांधण्यात आला आहे.
मुंबई : 'या' रेल्वे स्थानकात मुंबईतील सर्वात रुंद पादचारी पूल, लोकलसह मेट्रो प्रवाशांचाही त्रास होणार कमी

मुंबई : मेट्रोमुळे अंधेरी, घाटकोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी वाढली आहे. ही गर्दी लक्षात घेऊन घाटकोपर रेल्वे स्थानकात सर्वात रुंद पादचारी पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे लोकार्पण गुरुवारी खासदार मनोज कोटक यांनी केले.

घाटकोपर रेल्वे स्थानकातूनच मुंबईतील घाटकोपर वर्सोवा मेट्रो १ मार्गही सुरू होतो. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकात गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागते. याबाबत खासदार मनोज कोटक यांनी तत्कालीन रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. यानंतर रेल्वे स्थानकातील नवीन पूल आणि पूर्वेकडील डेकच्या निर्मितीचे आदेश रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी दिले होते. ४ नोव्हेंबर २०२१ रोजी या कामाचे भूमिपूजन खासदार मनोज कोटक यांच्याच हस्ते पार पडले होते. यानंतर एमआरव्हीसीकडून हे काम २ वर्षांत युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. त्यामुळे लोकलसह मेट्रो प्रवाशांचाही त्रास कमी होणार आहे.

प्रवाशांना अतिरिक्त सुविधा

नवीन पादचारी पूल १२ मीटर रुंद आणि ७५ मीटर लांबीचा आहे. या पुलाला प्लॅटफॉर्म क्रमांक २, ३, ४ वर सीएसएमटी बाजूने सरकते जिने बसवण्यात आले असून पूर्व दिशेलाही सरकत्या जिन्याची सुविधा देण्यात आली आहे. पूर्वेला डेकवरच बुकिंग ऑफिसची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या नवीन पूल आणि पूर्वेतील डेकमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना अतिरिक्त सुविधा मिळाल्या आहेत. सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. आमदार पराग शाह, प्रवीण छेडा, अशोक राय, भालचंद्र शिरसाट, जे. पी. सिंग यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, एमआरव्हीसी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in