मुंबईचा पाणीप्रश्न सभागृहात पेटला; शहरात टँकर लॉबी सक्रिय, सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचा आरोप

दूषित पाणीपुरवठा, वेळेत पाणी न येणे, पाण्याअभावी शौचालय बंद, मुंबई महापालिकेकडून अडीच हजार रुपयांत पाणी विकत घेऊन टँकर माफिया १० हजार रुपयांत पाणी विक्री, टँकर माफिया आणि पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत अशा अनेक मुद्यांच्या आधारे सभागृहातील सदस्य सचिन पडवळ यांनी घणाघाती हल्ला चढवला.
मुंबईचा पाणीप्रश्न सभागृहात पेटला; शहरात टँकर लॉबी सक्रिय, सत्ताधारी पक्षांसह विरोधकांचा आरोप
Published on

मुंबई : दूषित पाणीपुरवठा, वेळेत पाणी न येणे, पाण्याअभावी शौचालय बंद, मुंबई महापालिकेकडून अडीच हजार रुपयांत पाणी विकत घेऊन टँकर माफिया १० हजार रुपयांत पाणी विक्री, टँकर माफिया आणि पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत अशा अनेक मुद्यांच्या आधारे सभागृहातील सदस्य सचिन पडवळ यांनी घणाघाती हल्ला चढवला.

रितेश राय यांनी ‘६६ ब’ अंतर्गत पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यावेळी सदस्य बोलत होते. दरम्यान, सभागृहात पाणीप्रश्नावर बोलू न दिल्याने काँग्रेसचे नगरसेवक सभागृहात चांगलेच आक्रमक झाले होते. २० हून अधिक सदस्य बोलणार असून अर्ध्या तासांची वेळ असताना १ तास १० मिनिटं चर्चा झाली. त्यामुळे आता गटनेते बोलतील, असे महापौर रितू तावडे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची अपेक्षित उत्तर मिळालेली नाही, त्यामुळे आढावा घेऊन उत्तर द्यावे, अशी सूचना महापौर रितू तावडे यांनी यावेळी केली.

पाणीप्रश्न हा संपूर्ण मुंबईचा प्रश्न आहे. दूषित पाणी, पाणी वेळेत न येणं हे रोजचे झाले आहे. गोरेगाव आरे कॉलनीत आदिवासी पाड्यातील लोक आठवड्यातून एकदा आंघोळ करतात, असे एमआयएमचे गटनेते विजय उबाळे म्हणाले. वर्षानुवर्षे पाण्यावर चर्चा होत असते, पाईपलाइन फुटली तर संपूर्ण विभागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो. जलवाहिनी फुटली तर कुठे फुटली याचा नकाशा जल विभागाकडे नाही, टँकर माफिया बोगस पावत्या बनवतात आणि जादा दराने पाणी विकतात, असा आरोप करून टँकर माफियांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी प्रवीण छेडा यांनी केली.

एसटीपी प्लांट उभारले जात आहे, १२०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. पिण्या व्यतिरिक्त हे पाणी उपलब्ध होईल, असे प्रशासनाने सांगितले. परंतु रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाचे काय झाले, असा सवाल विशाखा राऊत यांनी उपस्थित केला.

यामिनी जाधव, स्वप्ना म्हात्रे, वखार खान, धर्मेश गिरी, आश्रफ आजमी, संध्या दोशी, प्रीती सातम, रोशन शेख, मीनाक्षी पाटणकर, डॉ सईदा खान आदी सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले.

मुंबईला रोज ४,६६५ दशलक्ष लिटर पाणी गरज भासते. भविष्यात पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे गरजेचे असून समुद्राचे खारे पाणी गोडे केल्यास २०० अधिक २०० दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होणार आहे. मनोरी येथील समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याबाबत वर्क ऑर्डर दिली आहे. या सगळ्याला काही कालावधी लागेल. जुन्या जलवाहिनी, गळतीमुळे पाणीपुरवठ्यावर परिणाम होतो, असे प्रशासनाने सांगितले.

टँकर पद्धतीत बदल करणार

टँकरमुळे असुविधेचा सामना करावा लागतो. टँकर पद्धतीत काही बदलत करता येईल का, याचा अभ्यास करून अहवाल सादर करण्यात येईल, असे ही अभिजीत बांगर यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांना निलंबित करा - गणेश खणकर

पाणीप्रश्नावर सदस्यांनी चर्चा केली, पण टँकर माफिया ८० टक्के पाणीचोरी करतात आणि पालिकेलाच विकतात. आठ दिवस टँकर माफिया मोडीत काढा, बघा पाणीपुरवठा सुरळीत होतो की नाही, पाणीचोरी रोखण्यासाठी पालिकेच्या जल विभागातील अधिकाऱ्यांचे निलंबन करा, अशी मागणी सभागृह नेते गणेश खणकर यांनी यावेळी केली. गळतीचा शोध घेण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेतला जात आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in