महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेचे ‘पे अॅण्ड पार्क’चे कंत्राट महिला बचतगटांना देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ए-वॉर्डातील मर्झबान रोडवरील व डी-वॉर्डातील सोफिया महाविद्यालय येथील असलेले पे अॅण्ड पार्कचे कंत्राट महिला बचतगटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी दोन्ही ठिकाणांसाठी ५६ लाख १८ हजार ९७६ रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्याचे पालिकेच्या वाहतूक विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
गरीब गरजू महिलांना रोजगार मिळावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून शिलाई मशीन, घरघंटी वस्तूंचे वाटप करण्यात येते. मुंबईत महिला बचतगट कार्यरत असून, बचतगटाच्या माध्यमातून महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी पे अॅण्ड पार्कचे कंत्राट देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे पालिकेचे उपायुक्त ( प्रकल्प) उल्हास महाले यांनी सांगितले.
ए वॉर्डातील मर्झबान रोडवर पालिकेचे पे अॅण्ड पार्क असून, त्या ठिकाणी ८८ वाहने पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. तर पालिकेच्या डी वॉर्डातील सोफिया महाविद्यालयाजवळील गल्लीत ९१ वाहने पार्क करण्याची जागा उपलब्ध आहे. या ठिकाणी ‘पे अॅण्ड पार्क’चे कंत्राट देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्याचे महाले यांनी सांगितले.
अशी आहे वाहन पार्किंगची क्षमता
ए वॉर्ड
दुचाकी वाहन पार्किंग : ४५
चारचाकी वाहन पार्किंग : ४३
डी वॉर्ड
दुचाकी वाहन पार्किंग : २८
चारचाकी वाहन पार्किंग : ६३