रस्ते घोटाळ्यात पालिका आयुक्त चौकशीला सामोरे जाणार?

आदित्य ठाकरे यांचा सवाल
रस्ते घोटाळ्यात पालिका आयुक्त चौकशीला सामोरे जाणार?

मुंबई : खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सिमेंट क्राॅकिटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे. पूर्व व पश्चिम उपनगरातील रस्ते सिमेंट कॉँक्रिटीकरण करण्याची कामे सुरू झाली आहेत; मात्र मुंबई शहरातील रस्ते सिमेंट कॉँक्रिटचे करण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. शहरातील रस्ते सिमेंट कॉँक्रिटचे करण्यात कंत्राटदाराने दुर्लक्ष केले असून, कंत्राटदाराचे निलंबन करावे लागले, त्याबद्दल जबाबदार असलेले रस्ते विभागाचे अधिकारी आणि पालिका आयुक्त चौकशीला सामोरे जातील का? असा सवाल युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

सध्याचे राज्यातील सरकार घटनाबाह्य असून, मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना फायदा मिळावा यासाठी सहा हजार कोटींच्या रस्ते घोटाळ्याला एक वर्ष उलटत आले आहे. या रस्त्यांच्या कंत्राटातील अनियमितता आम्ही सातत्याने मांडली आहे. तुम्ही ज्या पद्धतीने ही कंत्राटे त्यांना 'भेट' दिलीत इथपासून, ते त्या कंत्राटदारांना मिळणारा अवास्तव पैसा, मुंबईकरांच्या पैशातून कंत्राटदारांना होणारा प्रचंड आर्थिक नफा आणि हे सगळे होताना प्रत्यक्षात मुंबईत काहीही कामे झालेली नाही. इथपर्यंतची माहिती दिली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in