मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे ‘नो टेन्शन’, पाणी जपून वापरावे, पालिकेचे आवाहन

मुंबईकरांना पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याचे ‘नो टेन्शन’, पाणी जपून वापरावे, पालिकेचे आवाहन

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणात सध्या ३२.३२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला आहे. त्यामुळे जूनपर्यंत पुरेसा पाऊस पडणे आवश्यक आहे.

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात पाण्याच्या पातळीत घट झाल्याने राज्य सरकारने २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास होकार दिला आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने पिण्याच्या पाण्याचे टेन्शन नाही. त्यामुळे तूर्तास तरी पाणी कपातीबाबत कुठलाही निर्णय नाही, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही धरणात सध्या ३२.३२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा जमा आहे. हा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत घटला आहे. त्यामुळे जूनपर्यंत पुरेसा पाऊस पडणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने केलेल्या मागणीनुसार, राज्य सरकारने पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने येत्या पावसाळ्यापर्यंत पाण्याचे नियोजन केले आहे. महानगरपालिका मुख्यालयात मंगळवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला.

धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यावर महानगरपालिका प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. राज्य शासनानेदेखील निभावणी साठ्यातून महानगरपालिकेस पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पाणीकपात करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेचा नसल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मात्र पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in