पालिका डॉक्टरांचा सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा, रुग्णालयांचे कामकाज विस्कळीत; सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक

रुग्णालयांत कामाच्या ठिकाणी डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण असावे, या मागणीच्या पूर्ततेसाठी येत्या मंगळवारी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा मुंबई महापालिकेतील वैद्यकीय शिक्षक संघटनेने दिला आहे.
पालिका डॉक्टरांचा सामूहिक रजा आंदोलनाचा इशारा, रुग्णालयांचे कामकाज विस्कळीत; सुरक्षा अधिकाऱ्यांची बैठक
Published on

मुंबई : रुग्णालयांत कामाच्या ठिकाणी डॉक्टरांसाठी सुरक्षित वातावरण असावे, या मागणीच्या पूर्ततेसाठी येत्या मंगळवारी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा इशारा मुंबई महापालिकेतील वैद्यकीय शिक्षक संघटनेने दिला आहे.

कोलकाता येथे महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या घटनेनंतर देशभरातील निवासी डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले आहे. मुंबईतही सरकारी आणि पालिका रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनामुळे पालिकेच्या केईएम, शीव, नायर आदी प्रमुख रुग्णालयांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. त्याबद्दल रुग्णांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. यावर उपाय म्हणून पालिकेची परीघीय रुग्णालये, आरोग्य केंद्र, दवाखान्यांतील डॉक्टर हे प्रमुख रुग्णालयांमध्ये तैनात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, केईएममध्ये ४३, शीव रुग्णालयात ४१, कूपर रुग्णालयात ४५ तसेच नायर रुग्णालयात ४५ डॉक्टरांची सेवा रूजू करण्यात आली. त्यांनी बाह्य विभाग तसेच रुग्णालयाच्या व्यवस्थापनाची अन्य कामे सांभाळली.

सोमवारपर्यंत मुदत

मार्ड आणि आयएमए या संघटनांच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरू आहे. त्याला आपला पाठिंबा असल्याचे पालिका वैद्यकीय शिक्षक संघटनेने म्हटले आहे. निवासी डॉक्टरांना पाठिंबा देण्यासाठी शनिवारी आम्ही बाह्य रुग्ण सेवेतही सहभागी झालो नाही. डॉक्टरांच्या मागण्यांवर सोमवारपर्यंत योग्य तो तोडगा काढावा. नाहीतर मंगळवारी सामूहिक नैमित्तिक रजा आंदोलन करावे लागेल, असे या संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.

डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मागणीवर विचारविनिमय करण्यासाठी पालिका रुग्णालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी पालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला रुग्णालयांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. डॉक्टरांच्या मागण्यांबाबत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे.

- डॉ. नीलम अंद्राडे, रुग्णालय संचालक, मुंबई महानगरपालिका

logo
marathi.freepressjournal.in