देवनारमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार घरे; २७ मजली दोन इमारतींत उद्यान, मैदान, पार्किंग, सीसीटीव्ही

मुंबई महापालिकेत सुमारे १ लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शहर व उपनगरात स्टाफ क्वॉर्टर्स बांधण्यात आले आहेत
देवनारमध्ये पालिका कर्मचाऱ्यांना मिळणार घरे; २७ मजली दोन इमारतींत उद्यान, मैदान, पार्किंग, सीसीटीव्ही

मुंबई : उद्यान, मैदान, पार्किंग, सीसीटीव्ही, जॉगिंग ट्रॅक सोयीसुविधांसह देवनार येथे २७ मजली दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही इमारती पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असून त्यात ३०० ते ५०० चौरस फुटांची घरे असणार आहेत. यासाठी मुंबई महापालिका ४१३ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मुंबई महापालिकेत सुमारे १ लाखांहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शहर व उपनगरात स्टाफ क्वॉर्टर्स बांधण्यात आले आहेत. तरीही घरांची मागणी लक्षात घेता, देवनार गावात ६०० टेनामेंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूखंडांवर २७ मजली दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. घरांची संख्या ठरली नसून कंत्राटदाराची नियुक्ती झाल्यानंतर प्लॅनिंगनुसार किती घरे बांधायची हे निश्चित करण्यात येणार आहे.

प्रकल्प बाधितांसाठी ७४ हजार घरांची गरज

मुंबईत विविध प्राधिकरणाची कामे सुरू असून प्रकल्प बाधितांसाठी सदनिका बांधण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. प्राधिकरणांकडून फक्त २,११३ पुनर्वसन सदनिका प्राप्त झालेल्या आहेत आणि महानगरपालिकेचे स्वत:चे भूखंड विकसित करून ३,०९१ नवीन पुनर्वसन सदनिका बांधण्यात आल्या आहेत. परंतु ३५,००० पुनर्वसन सदनिकांची गरज होती. सन २०२३ मध्ये यामध्ये वाढ होऊन ती तब्बल ७४,७५२ निवासी सदनिकांपर्यंत वाढल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा होणार पुनर्विकास

२७ मजल्यांच्या २ इमारती

३०० ते ५०० चौरस फुटांची घरे

खर्च ४१२ कोटी ६४ लाख ४६ हजार

logo
marathi.freepressjournal.in