पालिकेचे अभियंते खड्डे शोधणार! पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदार जबाबदार; पालिका आयुक्तांचे आदेश

पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने तातडीने बुजवण्यात येणार आहेत
पालिकेचे अभियंते खड्डे शोधणार! पावसाळ्यापूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदार जबाबदार; पालिका आयुक्तांचे आदेश

मुंबई : पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसल्यास मास्टिक अस्फाल्ट तंत्रज्ञानाने तातडीने बुजवण्यात येणार आहेत; मात्र मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पालिकेच्या दुय्यम अभियंत्यांवर सोपवण्यात आली आहे.

तसेच खड्ड्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी ही दुय्यम अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी सिमेंट कॉँक्रीटच्या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नाही, तर मात्र कंत्राटदार व अभियंता जबाबदार असतील. पावसाळ्यात मुंबईकरांना त्रास होऊ नये यासाठी रस्त्यांवर खड्डा निदर्शनास येताच तातडीने बुजवण्याची कार्यवाही पूर्ण करा, असे निर्देश दुय्यम अभियंत्यांना दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यात खड्डे (बॅड पॅच) बुजवण्यासाठी पालिकेच्या ७ परिमंडळात १४ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई रस्त्यांचे सिमेंट कॉँक्रीटीकरणाचे काम प्रगतिपथावर असून, या सर्व रस्त्यांची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करावीत. तसेच वाहतूक सुरळीत सुरू राहील या दृष्टीने कॉँक्रीटच्या रस्त्यांचे आवश्यक त्या ठिकाणी पुनर्पृष्ठिकरण करावे, पावसाळ्यात सिमेंट कॉँक्रीटीकरणाची कोणतीही नवीन कामे हाती घेऊ नयेत, जेणेकरून नागरिकांना, वाहतुकीला त्रास होवू नये, असे स्पष्ट निर्देश पालिकेने सर्व संबंधित यंत्रणांना दिले आहेत. पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर आवश्यक तेथे डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पालिकेच्या सातही परिमंडळांतील विविध रस्त्यांवर मास्टिक अस्फाल्टद्वारे डागडुजी करणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात मुंबईतील सिमेंट कॉँक्रीट रस्त्यांसह सर्वच रस्त्यांची चांगली स्थिती राखली जाईल, यासाठी नियोजनपूर्वक कामांना वेग दिल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सिमेंट कॉँक्रीटीकरण रस्तेकामांचा आढावा घेत यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही यशस्वीपणे पूर्ण करण्याच्या सूचना यंत्रणांना दिल्या आहेत.

सर्व रस्त्यांचे कॉँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने ३९८ किलोमीटर रस्ते कॉँक्रीटीकरणासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यापैकी, पश्चिम उपनगरात आणि पूर्व उपनगरात मिळून ३२५ किलोमीटर अंतरापैकी काही कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. तर शहर विभागातील एक निविदा रद्द करण्यात आली आहे. रस्ते सिमेंट कॉँक्रीटीकरण प्रकल्पातील निविदेच्या अटीनुसार, सर्व रस्ते वाहतूक योग्य स्थितीत ठेवावेत, आवश्यक तेथे अपूर्ण रस्त्यांचे पुनर्पृष्ठिकरण करण्याच्या सूचना कंत्राटदारांना देण्यात आल्या आहेत.

खड्ड्यांच्या तक्रारीवर दुय्यम अभियंत्यांची नजर

खड्ड्यांसंदर्भातील तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी यावर्षीदेखील २२७ निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नियुक्त करण्यात येणार आहे. या दुय्यम अभियंत्यांनी समर्पित भावनेने कामकाज करावे, असे निर्देश भूषण गगराणी यांनी दिले आहेत. दुय्यम अभियंते हे २२७ निवडणूक प्रभागात प्रत्यक्ष फिरून खड्ड्यांसंदर्भात तक्रारीची स्वतःहून नोंद घेतील. तसेच तक्रार प्राप्त झाल्यानंतर परिमंडळनिहाय नेमलेल्या कंत्राटदारामार्फत मास्टिक अस्फाल्टद्वारे खड्डे बुजविण्यात आले आहेत का, याची खातरजमा दुय्यम अभियंता करतील.

सेवा रस्त्यांची लवकरच दुरुस्ती!

पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रूतगती महामार्गावर देखील दुरुस्ती योग्य ठिकाणी (बॅड पॅच) डागडुजीकामी कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. पश्चिम द्रूतगती महामार्ग आणि पूर्व द्रूतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी देखील महानगरपालिका प्रशासनाकडे सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्या अनुषंगाने लवकरच सेवा रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

रस्त्यावर पडलेले खड्डे शोधा!

रस्त्यावर पडलेले खड्डे दुय्यम अभियंत्यांनी स्वत:हून शोधावेत, रस्ते दुरूस्ती वेळेत होते का, याची दक्षता घ्यावी, नागरिक, लोकप्रतिनिधी, माध्यमे व समाजमाध्यमे यांच्याद्वारे प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करावी, असा उद्देश आहे. एकंदरच रस्त्यावर खड्डा आढळल्यानंतर तो तातडीने बुजविण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दुय्यम अभियंत्यांना देण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in