मुंबई : मुंबईत एकीकडे मुलांना खेळण्यासाठी मैदाने क्रीडांगण उपलब्ध होत नसताना मुंबई महापालिकेने मनोरंजन मैदाने, क्रीडांगण दत्तक देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी धोरण निश्चित करण्यात येणार असून, मुंबईकर नागरिकांना या विषयी पुढील महिनाभरात हरकती सूचना पाठवण्याचे आवाहन केले आहे. एकूणच मुंबईत मनोरंजन मैदाने क्रीडांगणे मिळणे कठीण झाले असताना दत्तक देण्याचा पालिकेने घाट का घातला ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मुंबईत एकूण २२९ उद्याने, ४३२ मनोरंजन मैदाने, ३१८ खेळाची मैदाने, २६ पार्क आहेत. मनोरंजन मैदाने क्रीडांगणे आता दत्तक तत्त्वावर देण्याबाबत महापालिकेने प्रारूप प्रस्तावित धोरण तयार केले असून, ते महापालिकेच्या www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबईकर नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि मनोरंजनासाठी पालिका अधिकाधिक सार्वजनिक मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी विकास नियंत्रण नियमावली २०३४ नुसार उद्याने/ मनोरंजन मैदाने/ खेळाची मैदाने व उपवने यासारखी आरक्षणे ठेवण्यात आली आहेत. मनोरंजन मैदाने व क्रीडांगणांचा विकास, देखभाल व दुरुस्ती ही स्थानिक संस्था, संघटना, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या सामुदायिक सामाजिक दायित्वातून करण्यासाठी मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याबाबत धोरण मसुदा मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने तयार केला आहे.
१० ऑक्टोबरपर्यंत हरकती-सूचना पाठवा
या धोरणाच्या मसुद्यावर नागरिक व संस्थांकडून तीस दिवसाच्या आत म्हणजे १० ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या हरकती व सूचना पाठविण्यासाठी ईमेल आयडी dysg.ta@mcgm.gov.in असा आहे. तर कार्यालयीन पत्ता - उद्यान अधीक्षक यांचे कार्यालय, दुसरा मजला, हम्बोल्ट पेंग्विन इमारत, मसीना रुग्णालयाजवळ, भायखळा (पूर्व) असा आहे.