पालिकेची मुख्यालय इमारत पर्यटकांचे आकर्षण

विद्युत रोषणाईच्या देखभालीचा खर्च साडेतीन कोटी
पालिकेची मुख्यालय इमारत पर्यटकांचे आकर्षण

मुंबई : दक्षिण मुंबईतील ब्रिटीशकालीन मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतींवर करण्यात येणारी विद्युत रोषणाई नेहमीचं पर्यटकांसाठी आकर्षण असते. मात्र या विद्युत रोषणाईच्या देखभालीचा खर्च तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपये असून, याचे कंत्राट देण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प राबवला जातो आहे. मागील वर्षभराच्या कालावधीत मुंबईच्या सौदर्यीकरणाच्या माध्यमातून मुंबईची रंगरंगोटी तसेच विद्युत रस्ते, झाडे, चौक आणि महत्वाच्या इमारतींवर विद्युत रोषणाई करण्यात आली. मुंबईच्या सौंदर्यात भर पडण्यासाठी सुशोभिकरणाचा प्रकल्प राबवला जातो आहे. पालिका मुख्यालयाच्या जुन्या आणि नव्या इमारतीवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचे कंत्राट मे. वाचडॉग सेक्युरिटी या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी परिचलन आणि देखभाल करण्यासाठी हे काम देण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

पालिका मुख्यालयाच्या दोन्ही इमारतींच्या विद्युत रोषणाईचे देखभाल आणि परिरक्षणाचे पाच वर्षांचे कंत्राट संपल्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी ई निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात विद्युत रोषणाईच्या कामात नवी थिम तयार करण्याचा समावेश होता. स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी तीन रंगासह अशोकचक्रही प्रदर्शित करण्याच्या कामाचाही समावेश होता. त्यानुसार मे औरा ब्राईट इंडिया प्रा. ली, मे वॉच डॉग सेक्युरिटी आणि मे स्टार इलेक्ट्रिक या तीन कंत्राटदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. निविदेतील अटी व शर्थीनुसार आवश्यक कागदपत्रे सादर केल्यामुळे मे वॉच डाग सेक्युरिटी या कंत्राटदाराला हे काम देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in