
मुंबई : मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयासह विविध रुग्णालयात औषध पुरवठा करणाऱ्या औषध पुरवठादाराचे १२० कोटी रुपये थकवले आहेत. मुंबई महापालिका जोपर्यंत औषध पुरवठादाराची थकीत रक्कम देत नाही तोपर्यंत औषध पुरवठा बंद करणार असल्याचा इशारा ‘ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर’ने दिला आहे. परिणामी सोमवार, १३ जानेवारीपासून पालिका रुग्णालयात आणीबाणी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून याला पालिका प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा `लायसन्स होल्डर`चे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.
ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर या वितरकांच्या माध्यमातून मुंबई महापालिकेच्या नायर, केईएम, सायन, कूपर या मोठ्या रुग्णालयासह अन्य रुग्णालयांत औषध पुरवठा, ऑपरेशन साहित्य पुरवठा करण्यात येतो. मात्र या वितरकाचे १२० कोटी रुपये पालिकेने थकवल्याचा आरोप पांडे यांनी केला आहे.
केईएम, नायर, सायन, कूपर, वांद्रे व कुर्ला येथील भाभा रुग्णालयात नेहमी औषध पुरवठा व ऑपरेशन संबंधित साहित्याचा पुरवठा करण्यात येतो. गेल्या सहा महिन्यांपासून या रुग्णालयात औषध व शस्त्रक्रियासंबधी साहित्य पुरवठा केला असून त्याचे जवळपास २० कोटी रुपये पालिकेकडून येणे आहे. तर रेट काॅक्ट्रक नुसार औषध पुरवठा व ऑपरेशन संबंधित साहित्य पुरवठा करण्यात येतो, त्याचे १०० कोटी असे एकूण १२० कोटी रुपये पालिकेने थकवले असल्याचे पांडे यांनी म्हटले आहे.
पैसे मिळावेत यासाठी सतत पाठपुरावा करण्यात येतो. मात्र पालिकेकडून केवळ आश्वासन दिले जाते. त्यामुळे आता पालिकेच्या प्रमुख रुग्णालयासह अन्य रुग्णालयात करण्यात येणारा औषध व शस्त्रक्रियासंबंधित साहित्य पुरवठा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून औषध पुरवठा बंद करण्यात येणार असून त्याबाबत पालिका आयुक्तांना इमेलद्वारे सूचित करण्यात आले आहे.
- अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग्स लायसन्स होल्डर