सुशोभीकरणासाठी मच्छीमारांना पालिकेच्या नोटीसा; कफ परेड येथील जेटीचे सुशोभीकरण बोटींना पर्यायी जागेचे काय ? मच्छीमार संघटनांचा सवाल

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे
सुशोभीकरणासाठी मच्छीमारांना पालिकेच्या नोटीसा; कफ परेड येथील जेटीचे सुशोभीकरण 
बोटींना पर्यायी जागेचे काय ? मच्छीमार संघटनांचा सवाल

मुंबई : कफ परेड येथे सुमारे ४०० हून बोटी असून, येथे बोटी पार्किंगची जागा उपलब्ध आहे. या जागेचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेची जागा नसताना एखाद्या नेत्याच्या सांगण्यावरून कफ परेड येथील जेटीचे सुशोभीकरण करण्यासाठी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सुशोभीकरणाला मच्छीमारांचा विरोध नाही, परंतु बोटी उभ्या करण्यास पर्याय काय ? असा सवाल मच्छीमार संघटनांनी उपस्थित केला आहे.

मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे काम मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. १ ऑक्टोबर रोजी येथील पहाणी यांनी केली असता बोटी उभ्या करण्यास आक्षेप घेत बोटी तात्काळ हटवण्याची कार्यवाही करण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली.

पालिकेच्या ए वॉर्डने अंमलबजावणी करत २७ ऑक्टोबरपर्यंत बोटी हटवा अन्यथा २८ ऑक्टोबर रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीशीतून दिला आहे. सुशोभीकरणाला मच्छीमारांचा विरोध नाही, परंतु आगाऊ सूचना न करता नोटीसा बजावण्यात आल्या आणि बोटी उभ्या करण्यास पर्याय काय याबाबत काहीच माहिती दिली नसून पालिका प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी केली आहे.

दरम्यान, कफ परेड येथील जेटीचे सुशोभीकरण करण्यात येणार असून, मच्छीमार संघटनांना स्वतः नोटीस बजावण्यात आल्याची माहिती ए वॉर्डचे सहाय्यक आयुक्त जयदीप मोरे यांनी सांगितले.

...तर संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार

कफ परेड येथील जागा महसूल विभागाची असून, पालिकेचा काहीही संबंध नाही. तरीही सुशोभीकरण करण्याच्या नावाखाली बोटी हटवण्याचा घाट घातला जात आहे. नोटिशीत दिलेली कार्यवाही ही कायद्याला धरून नसून कारवाई केल्यास आपल्यावर व आपल्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा मच्छिमार संघटनेने पालिकेला दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in