पालिका शाळांतील विद्यार्थी आजारी ! आरोग्य विभागाची धक्कादायक माहिती

१६० विद्यार्थ्यांना टीबी, २४ विद्यार्थ्यांना हदयरोग आणि ३ विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची लागण
पालिका शाळांतील विद्यार्थी आजारी ! आरोग्य विभागाची धक्कादायक माहिती

मुंबई : मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. मात्र पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या तपासणीत पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना विविध आजारांनी ग्रासले असून १६० विद्यार्थ्यांना टीबी तर २४ विद्यार्थ्यांना हदयरोग, ३ विद्यार्थ्यांमध्ये कुष्ठरोगाचे निदान झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये साडेचार लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. पालिका शाळेत येणारे विद्यार्थी गरीब कुटुंबातील असल्याने मोफत शिक्षण दिले जाते. २७ शालेय वस्तूंचे मोफत वाटप, बेस्ट बसचा मोफत प्रवास अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. पालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासह विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीवर भर दिला जात आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते, हे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

शालेय आरोग्‍य विभागाद्वारे दरवर्षी इयत्ता पहिली ते १० वीच्‍या विद्यार्थ्‍यांची शाळेत जाऊन वैद्यकीय चमूद्वारे आरोग्‍य तपासणी करण्‍यात येते. या आरोग्य तपासणीत मिळालेल्‍या संशय‍ित आजारी सर्व मुले व मुली यांना महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत दवाखाने व रुग्‍णालय येथे पुढील तपासणी, निदान व उपचारासाठी दाखल केले जाते. जून २०२२ ते एप्रिल २०२३ या वर्षांत इयत्ता पहिली ते १० वीतील २ लाख ३७ हजार ९२२ विद्यार्थ्‍यांची तपासणी करण्‍यात आली. यात दंतरोग, कान, नाक व घशाचे आजार, त्वचारोग, दृष्‍टीदोष, कमी वजन, रक्‍तक्षय, डोळ्याचे विकार, जीवनसत्त्वांची कमतरता, वाचादोष, फुफ्फुसांचे आजार, मानसिक विकार, अस्थिव्‍यंग, हृदयरोग व इतर या संशयित आजाराचे निदान करण्‍यात आले. यापैकी ४६ हजार ६८४ विद्यार्थ्‍यांना पालिका दवाखाने व रुग्‍णालयात निदानासाठी पाठवण्यात आले. दवाखाने व रुग्णालयात विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ४६ हजार ६८४ विद्यार्थ्‍यांपैकी २४ विद्यार्थ्‍यांना हृदयरोग, १६० विद्यार्थ्‍यांना क्षयरोग तर ३ विद्यार्थ्‍यांमध्ये कुष्‍ठरोगाचे निदान करण्‍यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आली.

दरम्यान, विद्यार्थ्यांमधील रक्तक्षयाचा प्रतिबंध करण्यासाठी राष्ट्रीय लोहयुक्त गोळ्या देण्याचा उपक्रम नोव्हेंबर २०१७ पासून सुरू करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मुलांना आठवड्यातून एकदा लोह गोळी शिक्षकांच्या निरीक्षणाखाली देण्यात आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

२० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांवर मोफत उपचार!

पालिकेच्‍या रुग्‍णालयात २०,५१५ विद्यार्थ्‍यांवर संपूर्ण मोफत उपचार करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

विद्यार्थ्यांमध्ये या आजारांचे निदान

दंतरोग, कान, नाक व घशाचे आजार, त्‍वचा रोग, दृष्‍टीदोष, कमी वजन, रक्तक्षय, डोळ्याचे विकार, जीवनसत्त्‍वांची कमतरता, वाचादोष, फुफ्फुसांचे आजार, मानसिक विकार, अस्थिव्‍यंग, हृदयरोग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in