

मुंबई : बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी पालिका प्रशासनाने रणनीती आखली आहे तर दुसरीकडे परवानाधारक चर्मकारांना स्टाॅल उपलब्ध करून देण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र वगळता नगरपथ विक्रेता समिती निर्णय घेईल, असा अभिप्राय पालिका आयुक्तांनी दिला आहे.
माजी नगरसेवक श्रीनिवास त्रिपाठी यांची मागणी असलेला हा ठराव २०१९ रोजी तत्कालीन नगरसेविका साक्षी दळवी यांनी मांडलेला होता. त्यावर आता मुंबई महापालिकेच्या आणि महापौर, उप महापौर पदाच्या निवडणुका पार पडल्यावर पालिका अनुज्ञापन खात्याने दिलेल्या माहितीच्या आधारे महापालिका आयुक्तांनी अभिप्राय दिला आहे. त्यात चर्मकारांना स्टॉल उपलब्ध करण्याबाबतचा निर्णय नगरपथ विक्रेता समिती घेणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ठराव कोणी मांडला
मुंबईतील परवानाधारक चर्मकारांना त्यांच्या पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने स्टॉल उपलब्ध करून देण्याबाबत २५ जुलै, २०१९ चा ठराव क्रमांक ४२९ अन्वये, उपरोक्त विषयाबाबत श्रीनिवास त्रिपाठी यांच्याकडून आलेली २४ जून, २०१९ ची ठरावाची सूचना आयुक्तांच्या अभिप्रायाकरिता पाठवण्यात आलेली होती. मूळ ठरावाची सूचना श्रीनिवास त्रिपाठी यांनी दिली होती, तथापि ती मांडण्याचे अधिकार साक्षी दळवी यांना दिल्यामुळे साक्षी दळवी यांनी मांडलेला व वैशाली पाटील यांनी अनुमोदन दिले होते.
पारंपरिक व्यवसायाला अभय
चर्मकारबांधवांच्या परंपरागत व्यवसायास लोकांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. मुंबईतील रस्त्यांवर परवानाधारक चर्मकार चप्पल/बुट शिवणे तसेच पॉलिश करणे असा पारंपरिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. हा पारंपरिक व्यवसाय करतात ते फाटकी-तुटकी छत्री किंवा प्लॅस्टिकचा वापर करून तयार केलेले छोटेखानी बैठे दुकान यांचा आसरा घेतात. मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शहरात चर्मकारांचा व्यवसाय अशा त-हेने उपेक्षित राहणे भूषणावह नाही. याकरिता अशा चर्मकारांसाठी मदतीचा हात पुढे करणे लाभकारक राहील; ही वस्तुस्थिती लक्षात घेता महापालिकेचे असे ठाम मत आहे की, मुंबईतील परवानाधारक चर्मकारांना त्यांचा पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी महापालिकेने स्टॉल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे करण्यात आली होती.