मुंबई : नगर पथविक्रेत्यांची १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी गुरुवारी, २९ ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून ३२ हजार ४१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी- कर्मचारी मिळून सुमारे ६५० जणांना सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विलेपार्ले (पूर्व) स्थित मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत नगर पथविक्रेता मतदारांची एकूण संख्या ३२ हजार ४१५ आहे. मतदारांपर्यंत मतदार पावती पोहोचविण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभाग कार्यालय (वॉर्ड) क्षेत्रात प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २४ डिजिटल वाहने नेमण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात शंभर याप्रमाणे एकूण २,४०० फलकांद्वारे देखील मतदारांपर्यंत निवडणुकीची माहिती पोहोचवण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम- २०१४ अंतर्गत महाराष्ट्र पथविक्रेता (उपजीविका संरक्षण व पथविक्री विनियमन) (महाराष्ट्र) नियम- २०१६ मधील तरतुदींच्या अनुषंगाने नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक तसेच समन्वयन अधिकारी (फेरीवाला धोरण) यांच्या निर्देशांनुसार, नगर पथविक्रेता समिती गठित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नगर पथविक्रेता समितीसाठी ५ ऑगस्ट २०२४ पासून निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मुंबई महानगरासाठी शिखर समितीसह एकूण आठ समित्यांच्या सदस्यपदासाठी निवडणूक लढवण्यास पात्र २३७ उमेदवारांची अंतिम यादी २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आली. निवडणुकीमध्ये शिखर समितीसह सातही परिमंडळांच्या मिळून एकूण ६४ जागांपैकी १० जागांवर एकही उमेदवार नाही. १७ जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्यामुळे या १७ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. उर्वरित जागांसाठी २९ ऑगस्टला सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या वेळेत मतदान होणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल.
मतमोजणीला ६५० जणांची टीम!
निवडणूक प्रक्रियेला आता अधिक वेग आला असून नगर पथविक्रेता समित्यांच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानासाठी प्रत्येक विभाग (वॉर्ड) स्तरावर मतदान केंद्र असतील. त्यात ६७ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेसाठी नियुक्त ५५० तर राखीव १०० असे अधिकारी व कर्मचारी मिळून ६५० जणांचे प्रशिक्षण सोमवारी सकाळी १० ते दुपारी २ यावेळी दरम्यान विलेपार्ले (पूर्व) येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.
उमेदवारांना मिळणार मार्गदर्शन
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या सर्व इच्छुक उमेदवारांना विशेष शिबीर आयोजित करून मार्गदर्शन करण्यात आले आहे. एकूणच, शासनाच्या मार्गदर्शनाखाली नगर पथविक्रेता समिती निवडणूक चोख आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महानगरपालिका प्रशासनातर्फे योग्य ती कार्यवाही केली जात आहे.