मुंबई : दृष्टीहीन व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यागांना बेस्ट बसेसने मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. दृष्टीहीन व दिव्यागांच्या मोफत प्रवासासाठी होणाऱ्या खर्चाचा मोबदला बेस्ट उपक्रमास मुंबई महापालिका अदा करते. दृष्टीहीन व ४० टक्क्यांहून अधिक दिव्यागांच्या मोफत बस प्रवासापोटी मुंबई महापालिकेने गेल्या सहा वर्षांत तब्बल २० कोटी ५२ लाख रुपये बेस्ट उपक्रमास आदा केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
अंध, अपंग, ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्या प्रत्येकाच्या कल्याणासाठी समान संधी, संरक्षण अंतर्गत केंद्र सरकारने ३ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर ३ डिसेंबर २०१५ रोजी मुंबई महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत दृष्टीहीन व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्यांना मोफत बेस्ट बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन द्या, अशी सूचना करण्यात आली होती. त्यानुसार दृष्टीहीन व ४० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग असलेल्यांना मोफत बेस्ट बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
दृष्टीहीन व दिव्यागांच्या मोफत प्रवासासाठी बेस्ट उपक्रमाला मुंबई महापालिका अनुदान देते. सन २०१६ - १७ ते नोव्हेंबर २०२३ पर्यंत बेस्ट उपक्रमाने अनुदाना पोटी मुंबई महापालिकेकडे २९ कोटी ९१ लाख २ हजार ४२३ रुपये इतकी मागणी केली होती. परंतु मुंबई महापालिकेच्या लेखा विभागानुसार २६ कोटी १९ लाख ६० हजार ८०० रुपये अनुदानापोटी देय असल्याचे स्पष्ट केले. तसेच अनुदानापोटी २० कोटी ५२ लाख ४० हजार रुपये बेस्ट उपक्रमास आदा केल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, उर्वरित ५ कोटी ६७ लाख २० हजार ८०० रुपये लवकरच आदा करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दृष्टीहीन व दिव्यागांना आर्थिक मदत (कोटीत)
बेस्टची मागणी - २९ कोटी ९१ लाख
देय अनुदान - २६ कोटी १९ लाख ६० हजार
प्रत्यक्षात अनुदान दिले - २० कोटी ५२ लाख ४० हजार रुपये
उर्वरित देय अनुदान - ५ कोटी ६७ लाख २० हजार रुपये