
मुंबई : मुंबई महानगरात अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका कारवाई करत आहे. याच पार्श्वभूमीवर, वेसावे येथील अनधिकृत पाच बहुमजली इमारतींवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के (पश्चिम) विभागाने निष्कासनाची कारवाई केली आहे.
वेसावे भागातील पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या दलदलीच्या प्रदेशावर आणि सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात सदर अनधिकृत बांधकाम होते. संबंधितांना वेळोवेळी नोटीस बजावूनही त्या नोटीसला प्रतिसाद देण्यात आले नाही. दलदलीच्या क्षेत्रातील या अनधिकृत बांधकामामुळे जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने बृहन्मुंबई महानगरपालिका उपायुक्त (परिमंडळ-४) डॉ. भाग्यश्री कापसे आणि सहायक आयुक्त (के पश्चिम) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रातील (कोस्टल रेग्यूलेशन झोन) तेरे गल्लीतील कुटूर हाऊस (तळमजला +५), वेसावे पंप हाऊससमोरील साईश्रद्धा निवास (तळमजला +१), गोमा गल्ली येथील नागा हाऊस (तळमजला +४), मांडवी गल्ली येथील झेमणे हाऊस (तळमजला +३), बाजार गल्ली येथील गणेश सागर (तळमजला +३) या इमारतींचे मागील वर्षभराच्या कालावधीत अनधिकृतपणे बांधकाम करण्यात आल्याचे निदर्शनास आले. म्हणजेच बांधकामासाठी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नव्हती. या पार्श्वभूमीवर निष्कासनाची कारवाई हाती घेण्यात आली. ३५ हँड ब्रेकर, ८ गॅस कटर तसेच ८ जनरेटरच्या सहाय्याने इमारतीचे पाडकाम करण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेच्या ८० अधिकारी-कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, वेसावे भागातील सागरी किनारा व्यवस्थापन क्षेत्रात अशाप्रकारच्या आणखी ३५ अनधिकृत इमारती बांधण्यात आल्याचे महानगरपालिकेच्या निदर्शनास आले आहे. सदर बांधकामेही याच कारवाई अंतर्गत पुढील काही दिवसांमध्ये निष्कासित करण्यात येतील, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात येत आहे.