पावसाळ्यापूर्वीच पालिका ॲक्शन मोडमध्ये; विविध कामांसाठी २५ कोटींचा खर्च!

जीओपाॅलिमर तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्जन्य जलवाहिन्यांना आतून मजबूत केलं जाणार.
पावसाळ्यापूर्वीच पालिका ॲक्शन मोडमध्ये; विविध कामांसाठी २५ कोटींचा खर्च!

मुंबई : पुनर्बांधणी, बॉक्स वाहिनीचे बांधकाम, मेजर दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिनीशेजारी संरक्षक भिंत बांधणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामुळे पर्जन्य जलवाहिनीशेजारी राहणाऱ्या रहिवाशांना पावसाळ्यात पूरस्थितीपासून दिलासा मिळणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल २५ कोटी रुपये खर्चणार आहे.

मुंबई शहर व दोन्ही उपनगरात पर्जन्य जलवाहिनीचे जाळे विस्तारले आहे. सांडपाणी वाहून नेणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. जुन्या झाल्याने पावसाळ्यात पर्जन्य जलवाहिनी शेजारी राहणाऱ्या रहिवाशांना पूरस्थितीचा सामना करावा लागतो. पश्चिम उपनगरात असलेल्या पर्जन्य जलवाहिनी मजबूत करण्यासाठी गुरुवारी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यासाठी पालिका २५ कोटी रुपये खर्चणार आहे.

जुन्या व जीर्ण झालेल्या पर्जन्य जलवाहिनी बदलणे, दुरुस्ती करणे, पुनर्बांधणी करणे, पर्जन्य जलवाहिनीशेजारी संरक्षक भिंत बांधणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या पर्जन्य जलवाहिन्या जुन्या झाल्याने त्या नव्याने आतून कोटींग करण्याचा निर्णय पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाने यापूर्वीच घेतला आहे. मुंबई शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांना आतून मजबूत करण्यासाठी जीओपाॅलिमर तंत्रज्ञानाचा वापर करत कोटींग करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी मुंबई महापालिका तब्बल ४१५ कोटी ५८ लाख ४ हजार ११२ रुपये खर्चणार आहे. जीओपाॅलिमर तंत्रज्ञानाचा वापर केल्याने पर्जन्य जलवाहिनीतील घाण पाणी रस्त्यावर येणे बंद होईल आणि मुंबई शहर दुर्गंधीमुक्त होईल, असा विश्वास पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागातील अधिकाऱ्याने व्यक्त केला.

logo
marathi.freepressjournal.in