बकरी ईद सणासाठी पालिका सज्ज ; देवनार पशुवधगृहात चोख व्यवस्था करण्याचे निर्देश

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी ६ पाणी उपसा पंप बसवण्यात येत आहेत
बकरी ईद सणासाठी पालिका सज्ज ; देवनार पशुवधगृहात चोख व्यवस्था करण्याचे निर्देश

आगामी बकरी ईद सणाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात सर्व प्रकारच्या व्यवस्थांचे चोख नियोजन करावे त्यासाठी सर्व विभागांनी एकत्रितपणे येऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर देवनार पशुवधगृहात विविध यंत्रणांकडून दिल्या जाणाऱ्या सेवासुविधा आणि पूर्वतयारीबाबत अतिरिक्त आयुक्त हर्डीकर यांनी मंगळवारी आढावा घेतला. यावेळी राज्य पशूसंवर्धन विभागाचे सहआयुक्त डॉ. कांबळे, महानगरपालिका उपआयुक्त संजोग कबरे, पोलीस उपायुक्त (वाहतूक) राजू भुजबळ, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, अग्निशमन दल व वाहतूक पोलीस आदी संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या देवनार पशुवधगृहात १६ ते ३० जून या कालावधीदरम्यान जीवंत म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी बकरी ईदच्या आणि त्यानंतरचे दोन दिवस धार्मिक पशुवध परवानगी देण्यात आली आहे. बकऱ्यांबाबत धार्मिक पशुवधासाठी परवानगी देताना ती ‘धार्मिक पशुवध धोरण’ याच्या अधीन राहून देण्यात येते. तसेच दरवर्षीप्रमाणे म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध हा केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे.

या सोयीसुविधा उपलब्ध

बकरी ईद सणाच्या १५ दिवसांच्या कालावधीदरम्यान देवनार पशुवधगृहात अंदाजे ७ हजार ५०० दशलक्ष टन कचऱ्यांचे निर्मूलन करण्यासाठी रोज ३०० कामगार, ५ पिकअप व्हॅन, २ जेसीबी, ४ डंपर, मृत जनावरे वाहून नेण्यासाठी ४ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांसाठी परिसरातील २५० सुविधा केंद्रांसह ९० मोबाईल शौचालयांचीही व्यवस्था करण्यात येत आहे. व्यापाऱ्यांची नोंदणी व प्राण्यांचे आवक-जावक व्यवस्थापन करण्यासाठी क्यूआर कोड यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. देवनार पशुवधगृहात सुरक्षेच्या दृष्टीने महानगरपालिकेचे ३०० सुरक्षारक्षक दोन पाळीत तैनात असतील. नागरिकांसाठी २ आरोग्य केंद्र आणि ४ रुग्णवाहिका तसेच जनावरांसाठी २ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात येत आहे. आपत्कालीन व्यवस्थापनाच्या अनुषंगाने फायर मार्शल अग्निशामक व्यवस्था असेल. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी ६ पाणी उपसा पंप बसवण्यात येत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in