मुंबई : इमारतीत फेरबदल करताना नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. असे असताना पालिका मुख्यालयात सुधारित आराखडा मंजुरीविनाच विविध नूतनीकरणाची कामे करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदारातर्फे केवळ रेखाचित्रे सादर करण्यात आली असून कोणत्याही कामासाठी सुधारित आराखडा सादर केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीत विविध नुतनीकरण कामे करण्यात आली आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पालिकेकडे पालिका मुख्यालयात करण्यात आलेल्या विविध कामांची माहिती मागत सुधारित आराखड्याची विचारणा केली होती. त्यानुसार महापालिकेने २०१४ पासून आजमितीस बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात विविध नूतनीकरण कामाअंतर्गत केलेल्या कामांची दिलेल्या माहितीत, कोणत्याही नूतनीकरण कामांचा सुधारित आराखडा नाही. तर पालिकेने खासगी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागारामार्फत सादर करण्यात आलेली रेखाचित्रे दिली आहेत. यात स्कायवे इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडतर्फे विस्तारित इमारतीचा तळमजला, पहिला माळा, दुसरा माळा येथे करण्यात आलेल्या सुधारित कामासाठी इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून सुधारित आराखड्याची मंजुरी घेतली नाही. तर शानदार इंटेरिअर्स प्रायव्हेट लिमिटेडतर्फे तळमजला, पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, चौथा माळा आणि पाचवा माळा येथे करण्यात आलेल्या सुधारित कामांसाठी इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून सुधारित आराखड्याची मंजुरी घेतलेली नाही, असा आरोप गलगली यांनी केला आहे.
पालिका मुख्यालयात सुधारित काम करताना महानगरपालिका वास्तुविशारद यांच्या संमतीने आराखडा मंजूर करणे आवश्यक आहे. पण याकामी खासगी वास्तुविशारद यांनी तयार केलेल्या रेखाचित्रावर काम करण्यात आले आहे. त्यामुळे सुधारित आराखडा महानगरपालिका वास्तुविशारद यांच्या संमतीने इमारत प्रस्ताव विशेष कक्षाकडून सुधारित आराखड्याची मंजुरी घेण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी गलगली यांची मागणी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सुधारित आराखडा सादर करत परवानगीशिवाय केलेल्या विविध नूतनीकरण कामाबाबत संबंधित कंत्राटदार आणि अधिकारी वर्गावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
असे झाले नुतनीकरण व फेरबदल
सुधारित आराखडा मंजूर न करता नूतनीकरण आणि अन्य अंतर्गत फेरबदल करण्यात आले आहे. यात तळमजला येथे राजकीय पक्ष, हेरिटेज हॉल, रोख विभाग, परीरक्षण, सीए कार्यालयाचा समावेश आहे. दुसऱ्या मजल्यावर म्युझियम आहे. पहिला मजल्यावर अध्यक्ष कार्यालय, रीडिंग रूम आहे. दुसरा मजल्यावर उपमहापौर कार्यालय, विधी कार्यालय, अतिरिक्त आयुक्त कार्यालय, आपत्कालीन विभाग आहे. तिसरा मजल्यावर संचालक, उपायुक्त आणि सीए कार्यालय आहे. चौथ्या मजल्यावर सीए वित्त, एमसीए, आयटी, चौकशी विभाग यांची कार्यालये आहेत. तर पाचव्या मजल्यावर विकास नियोजन यांचे कार्यालय आहे.