पालिका लागली कामाला; शहर, उपनगरातील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी निविदा

मान्सूनपूर्व मेजर मायनर कल्व्हर्टस बॉक्स ड्रेन रोड साईड ड्रेन मधील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाने कंबर कसली आहे.
पालिका लागली कामाला; शहर, उपनगरातील नाल्यांतील गाळ काढण्यासाठी निविदा

मुंबई : मान्सूनपूर्व मेजर मायनर कल्व्हर्टस बॉक्स ड्रेन रोड साईड ड्रेन मधील गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाने कंबर कसली आहे. शहर, पूर्व व पश्चिम उपनगरातील नाल्यातील गाळ काढण्यासाठी ६० ते ७० कोटींच्या निविदा मागवल्या आहेत.

दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाल्यातील गाळ उपसा केल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. परंतु पावसाळ्यात मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्याने मुंबई महापालिकेवर टीकेची तोफ डागली जाते. गेल्या वर्षी २०२३ मध्ये नाल्यातील गाळ उपसा करणे, मिठी नदीतील गाळ उपसा करणे यासाठी २८० कोटींचा खर्च करण्यात आला होता. परंतु गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी न लावल्याने पाणी तुंबण्याचे प्रमाण कमी झाले होते. परंतु गेल्या काही वर्षांतील अनुभव लक्षात घेता यंदा नाल्यातील गाळ काढण्यासाठी जानेवारी महिन्यात पहिल्या टप्प्यातील निविदा मागवण्यात आल्या आहेत.

यात मेजर, मायनर नाल्यातील गाळ उपसा करणे, रस्त्यांवरील कल्व्हर्टस साफ करणे, बाॅक्स ड्रेन, रोड साईड ड्रेन मधील गाळ काढण्यासाठी शनिवारी निविदा मागवण्यात आल्या आहेत. यात शहरातील नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी सुमारे २० कोटी तर पूर्व उपनगरातील नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी २२ कोटी तर पश्चिम उपनगरातील नाल्यातील गाळ उपसा करण्यासाठी २५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. शनिवारी यासाठी निविदा मागवण्यात आल्या असून पात्र कंत्राटदाराला कंत्राट देण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या पर्जन्य जल वाहिनी विभागाकडून देण्यात आली.

दरवर्षी ३१ मेपर्यंत नाल्यातील १०० टक्के गाळ उपसा करण्याचे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवून नालेसफाईची कामे हाती घेण्यात येतात. यंदा ही मे महिन्यापर्यंत १०० टक्के गाळ उपसा करण्याचे उद्दीष्ट ठेवले असून टप्याटप्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, गेल्या वर्षी नालेसफाईचे काम अपूर्ण, नाल्यांतील गाळ उपसा झाला नाही, अशा तक्रारी करण्यासाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट प्रणालीच्या ९३२४५००६०० नंबर मुंबईकरांसाठी जारी केला होता. यंदाही तक्रारींसाठी नंबर जारी करण्यात यावा, अशी मागणी मुंबईकरांनी केली आहे.

असे होते काम!

एकूण १०० टक्के नालेसफाईपैकी ७५ टक्के गाळ पावसाळ्यापूर्वी ३१ मेपर्यंत काढण्यात येतो. तर पावसाळ्यात १० टक्के तर पावसाळ्यानंतर १५ टक्के नालेसफाई करण्यात येते.

कुठे, किती अंतराचे नाले

मुंबई शहर

नाले : २७

g किमी : २१.९७

पूर्व उपनगर

नाले : १११

g १०२.१ किमी

पश्चिम उपनगर

नाले : १४२

g १३९.८४ किमी

logo
marathi.freepressjournal.in