

श्रेया जाचक/मुंबई
मुंबई महापालिकेच्या (बीएमसी) बिगर-राज्य मंडळाशी संलग्न शाळांना वाढता प्रतिसाद मिळत असून त्या पार्श्वभूमीवर, अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश देता यावा यासाठी चालू शैक्षणिक वर्षात विद्यमान शाळांमध्ये अतिरिक्त तुकड्या (डिव्हिजन) वाढवण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.
महानगरपालिकेने २०२० मध्ये शहरात बिगर-राज्य मंडळाच्या शाळा सुरू केल्या. तेव्हापासून या शाळांना मध्यमवर्गीय तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली असून केंद्रीय व आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमात शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळत आहे. महानगरपालिकेने २ जानेवारीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू केली असून ती २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. मोठ्या मागणीमुळे ही प्रक्रिया राज्य मंडळाच्या शाळांपेक्षा लवकर सुरू करण्यात आली आहे. प्रवेश लॉटरी पद्धतीने दिले जात आहेत. या वर्षी नर्सरी ते इयत्ता पहिलीपर्यंतच्या वर्गांसाठी २,२६२ जागा उपलब्ध असून या जागा केंद्रीय व आंतरराष्ट्रीय बोर्डशी संलग्न असलेल्या २२ बीएमसी शाळांमध्ये आहेत. यामध्ये १९ शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) अंतर्गत तर प्रत्येकी एक शाळा आयसीएसई, आयबी आणि आयजीसीएसई मंडळाशी संलग्न आहे.
मार्चपर्यंत आणखी तीन शाळा
सध्या तुकड्या वाढवण्यावर भर देण्यात येत असला तरी मार्चपर्यंत आणखी तीन शाळा सुरू होण्याची शक्यता आहे. या शाळांच्या इमारती ताब्यात आल्यानंतर, मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे कोणत्या बोर्डशी संलग्नता घ्यायची याचा निर्णय घेतला जाणार आहे. प्रत्येक तुकडीत ४० विद्यार्थी असतात. त्यामुळे दोन ते तीन तुकड्या वाढवून १०० ते १५० अतिरिक्त विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे, असे जांभेकर यांनी सांगितले.
गेल्या वर्षी विविध बिगर-राज्य मंडळ अभ्यासक्रम देणाऱ्या एकूण २१ महानगरपालिका शाळांमधील १,२४२ जागांसाठी २,४५९ अर्ज प्राप्त झाले होते.
प्रत्येक शाळेत केवळ ८० जागा असताना ३०० ते ४०० अर्ज प्राप्त झाले. त्यामुळे लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्यात आले होते. दुर्दैवाने ५० टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारावे लागले. त्यामुळे पालिका शिक्षण अधिक सुलभ करण्यासाठी तुकड्या वाढवण्यावर भर देणार आहे.
लहान वर्गांसाठी सकाळी व दुपारी अशा सत्रांचे नियोजन करून अधिक तुकड्या समाविष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लहान विद्यार्थ्यांचे शालेय तास कमी असल्याने त्यांचे वर्ग सकाळी घेतले जातील, तर मोठ्या विद्यार्थ्यांचे वर्ग संध्याकाळी घेतले जातील, कारण त्यांचे शालेय तास अधिक असतात तसेच शाळेतील उपलब्ध जागेचा पूर्ण उपयोग करण्यात येईल.
प्राची जांभेकर, पालिका उपायुक्त, शिक्षण