भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा पालिकेचा निर्णय

पालिकेच्या मार्केट्समध्ये फेकण्यात आलेला किंवा खराब झालेला भाजीपाला एकत्र करत एका ठिकाणी जमा करण्यात येईल
भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा पालिकेचा निर्णय

मुंबई कचरामुक्तीसाठी आता पालिकेच्या मार्केट्समधील भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या मार्केट्समध्ये फेकण्यात आलेला किंवा खराब झालेला भाजीपाला एकत्र करत एका ठिकाणी जमा करण्यात येईल. त्यानंतर भाजीपाल्याच्या कचऱ्यावर प्रक्रिया करत खतनिर्मिती करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आशिष शर्मा यांनी दैनिक ‘नवशक्ति’शी बोलताना दिली.

पर्यावरणाच्या रक्षणासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. मुंबई महापालिकेची ९२ मार्केट्स असून, या मार्केट्समध्ये फळभाज्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक येतात; परंतु अनेक मार्केट्समध्ये भाजीपाला खराब झाल्यानंतर कुठे तरी फेकण्यात येतो. यामुळे मार्केट्समधील गाळेधारक व ग्राहकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मार्केट्समध्ये फेकण्यात येणारा खराब भाजीपाला एकत्र करण्यात येणार आहे. एकत्र करण्यात येणारा भाजीपाला पालिकेने निश्चित केलेल्या जागेवर जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर पालिकेच्या उद्यान विभागाशी समन्वय साधत उद्यानात जागा उपलब्ध केल्यानंतर त्या ठिकाणी खतनिर्मिती प्रकल्प राबवण्यात येईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत आयुक्त पदावर असताना भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून खतनिर्मिती प्रकल्प २००८ मध्ये राबवण्यात आला होता. त्या ठिकाणी प्रकल्प यशस्वी झाला असून, त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या मार्केट्समध्ये फेकण्यात आलेल्या भाजीपाल्याच्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्यात येईल, असेही शर्मा यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in