व्यवसाय सुलभतेच्या दिशेने पालिकेची वाटचाल विधी, लेखन साहित्याच्या दरात सुधारणा ; कंत्राटदारांत स्पर्धा वाढणार

या आकारणीवर पुन्हा १८ टक्के दराने वस्तू व सेवा कर देखील गणना करुन आकारण्यात येते
व्यवसाय सुलभतेच्या दिशेने पालिकेची वाटचाल विधी, लेखन साहित्याच्या दरात सुधारणा ; कंत्राटदारांत स्पर्धा वाढणार

मुंबई : मुंबई महापालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांमार्फत निविदा मागवल्यानंतर कंत्राट करार केले जातात. असे करार करताना पालिकेच्या वतीने विधी व लेखन साहित्य कर आकारले जातात. या दरांमध्ये पालिकेने १ सप्टेंबर २०२३ पासून सुधारणा केली आहे. कर आकारणीचे पूर्वीचे वेगवेगळे असे १९ स्तर कमी करून आता अवघे ४ स्तर निश्चित केले आहेत. त्यामुळे महापालिकेने व्यवसाय सुलभतेच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलल्याने कंत्राटदारांमध्ये स्पर्धा वाढणार आहे.

पालिकेच्या विविध कामांसाठी निविदा व प्रशासकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर पात्र नियुक्त कंत्राटदारांसमवेत करार केला जातो. या कराराच्या अधीन राहून प्रकल्प, योजना, कामांची अंमलबजावणी करण्यात येते. कराराची कार्यवाही करताना महानगरपालिकेचे लेखन साहित्य व विधी विषयक खर्च होतात. स्वाभाविकच ते कंत्राटदारावर आकारले जातात. या पद्धतीनुसार वेळोवेळी विधी व लेखन साहित्य आकारणी दरांमध्ये देखील वाढ करण्यात येते. तसेच या आकारणीवर पुन्हा १८ टक्के दराने वस्तू व सेवा कर देखील गणना करुन आकारण्यात येते.

सुधारणा १ सप्टेंबर पासून लागू

मुंबई महापालिकेच्या कामकाजामध्ये अधिकाधिक सुलभता आणि पारदर्शकता आणण्यावर पालिकेने भर दिला आहे. पालिका आयुक्तांच्या सुचनेनुसार अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी विधी आकार आणि लेखन साहित्य आकार यांचे दर, त्यांची वर्गवारी यामध्ये सुधारणा केली आहे. ही सुधारणा १ सप्टेंबर पासून लागू देखील झाली आहे.

१९ वर्गवारी आता अवघ्या ४ वर

विधी व लेखन साहित्य कर आकारणीमध्ये प्रशासकीय सुधारणा करून महानगरपालिकेने आता पूर्वीच्या तब्बल १९ वर्गवारी आता अवघ्या ४ वर आणल्या आहेत. यामुळे कंत्राट करारांच्या कामकाजात सुलभता येईल, लहान कामांच्या निविदांमध्ये अधिकाधिक स्पर्धा निर्माण होईल, अशी माहिती डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in