प्रकल्पासाठी पालिकेचे स्वतःचे कास्टिंग यार्ड

गोखले पूल, विद्याविहार, सीएसएमटी स्थानकातील हिमालयी पूल अशी कामे करताना सामानाची जुळवाजुळव करण्यात अडचण निर्माण झाली होती.
प्रकल्पासाठी पालिकेचे स्वतःचे कास्टिंग यार्ड

मुंबई : मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांसाठी लागणारी साधनसामग्री मुंबईत प्रकल्प ठिकाणी तयार करण्यासाठी स्वतः कास्टिंग यार्ड कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे असून जमिनीसाठी भाड्याच्या जागेचा मुंबई महापालिकेने शोध सुरु केला आहे.

गोखले पूल, विद्याविहार, सीएसएमटी स्थानकातील हिमालयी पूल अशी कामे करताना सामानाची जुळवाजुळव करण्यात अडचण निर्माण झाली होती. तसेच खर्चातही वाढ झाली. त्यात भविष्यात गोरेगाव मुलुंड लिंक रोड, वसोॅवा दहिसर दहिसर भाईंदर उत्तन मार्ग प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. पुलाच्या कामांसाठी लागणारी साधनसामग्री मुंबईतच तयार करण्यासाठी पालिका आता स्वत:चे कास्टिंग यार्ड बनवणार आहे. यासाठी जमीन उपलब्ध झाल्यानंतर या ठिकाणी पालिका कास्टिंग यार्ड बनवणार असून या जागांचे भाडे पालिकेकडून ठरलेल्या दरानुसार मालकाला दिले जाणार आहे.

या प्रकल्पांसाठी कास्टिंग यार्डची गरज!

पालिकेकडून आगामी काळात वर्सोवा ते दहिसर, दहिसर ते मीरा रोड आणि माहीम ते वांद्रे वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे असे मेगा प्रोजेक्ट राबवण्यात येत आहेत. प्रकल्पाच्या बांधकामासाठी पुलाचा काही भाग तयार करण्यासाठी कास्टिंग यार्डची आवश्यकता आहे. प्रकल्प खर्चाच्या सुमारे १ ते २ टक्के खर्च प्रकल्पांच्या कास्टिंग यार्डसाठी लागणार आहे. पालिकेचे सध्या तीन मेगा प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत सुमारे १८,६९७ कोटी रुपये आहे.

खर्चात मोठी बचत!

पालिकेला दहिसर वर्सोवा लिंक रोडच्या कास्टिंग यार्डसाठी जमीन उपलब्ध झाली नाही तर सुमारे २५६ कोटी रुपये खर्च करावे लागतील. दहिसर ते मीरा रोडसाठी कास्टिंग यार्डसाठी ३ वर्षांचे भाडे देण्यासाठी २२४ कोटी रुपयांची तरतूद केली होती. तर गोरेगाव मुलुंड लिंक रोडच्या बोगद्याच्या कामासाठी बीएमसीने कास्टिंग यार्डसाठी कंत्राटदाराला नुकतेच १३४ कोटी रुपये दिले आहे. या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च ६३०१ कोटी रुपये आहे.

logo
marathi.freepressjournal.in