
निरी व आयआयटीच्या मदतीने मुंबईतील नाल्यातील पाणी शुद्ध करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ‘इन सिटू ट्रिटमेंट’द्वारे नाल्यातून समुद्रात जाणारा कचरा रोखला जाणार आहे. यामुळे समुद्रात निर्माण होणारे प्रदूषण रोखणे हा मुख्य उद्देश असल्याचे मुंबई मलनि:सारण प्रकल्पाचे मुख्य अभियंता अशोक मेंगडे यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकल्पासाठी ८३ कोटींचा खर्च अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
नाल्यातून समुद्रात जाणाऱ्या घाण पाण्यामुळे समुद्राला प्रदूषणाचा धोका निर्माण होतो. राष्ट्रीय हरित लवादाने यासाठी मुंबई महापालिकेला २८ लाखांचा दंड ठोठावला असून, सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तरीही राष्ट्रीय हरित लवादाने दिलेल्या आदेशानुसार समुद्रात जाणारे घाण पाणी रोखण्यासाठी पम्पिंग स्टेशनच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात येते. पम्पिंग स्टेशनद्वारा समुद्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करण्यास वेळ लागतो. त्यामुळे आता नाल्यातील पाणी शुद्ध करण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील पाच वर्षांसाठी हा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. नाल्यातील पाणी स्वच्छ करण्यासाठी १०० टक्के शिवरेज नेटवर्क सुरू आहे.