
मंगळवारी माहीम आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान एका गोणीत सापडलेल्या महिलेच्या हत्येचा पर्दाफाश करण्यात मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांना यश आले आहे. सारिका दामोदर चाळके असे या २६ वर्षांच्या महिलेचे नाव असून याप्रकरणी विकास जगन खैरनार या २१ वर्षांच्या हाऊसकिपिंगचे काम करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने या हत्येची कबुली देताना हत्येनंतर हत्येचा पुरावा नष्ट केल्याचे सांगितले.
उसने पैसे आणि महिलेकडून होणाऱ्या सतत अपमानास्पद वागणुकीमुळे त्याने या महिलेची हत्या केली. हत्येनंतर त्याने गोणीत भरून तिचा मृतदेह फेकून दिला होता; मात्र या गोणीतील हरी ओम ड्रग्ज गोरेगाव या अक्षराद्वारे या हत्येचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवार, २४ मे रोजी माटुंगा आणि माहीम रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर रेल्वे पोलिसांना गोणीत एका महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर तिचा मृतदेह गोणीत टाकून ती गोणी रेल्वे ट्रॅकवर टाकून मारेकर्याने हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी अज्ञात मारेकर्याविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात करण्यात आली होती.