आईसह मोठ्या बहिणीची हत्या करुन मुलीची प्रियकरासोबत आत्महत्या

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या घटनेची माहिती बंगलोर येथे राहणाऱ्या मृत महिलेच्या पतीला देण्यात आली आहे.
आईसह मोठ्या बहिणीची हत्या करुन मुलीची प्रियकरासोबत आत्महत्या

कौटुंबिक वादातून आईसह मोठ्या बहिणीची हत्या केल्यानंतर लहान बहिणीने हत्येसाठी मदत करणाऱ्या आपल्या प्रियकर चालकासह घरातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून या घटनेची माहिती बंगलोर येथे राहणाऱ्या मृत महिलेच्या पतीला देण्यात आली आहे.

किरण आशिष दळवी, मुस्कान आशिष दळवी, भूमी आशिष दळवी आणि चालक शिवदयाल सेन अशी या चौघांची नावे आहेत. आशिष दळवी हे कांदिवली परिसरात राहत असून त्यांच्या वडिलांचे तेथे एक रुग्णालय आहे. सध्या ते रुग्णालय बंद असून याच रुग्णालयातील एका फ्लॅटमध्ये त्यांची पत्नी किरण ही त्यांच्या दोन मुली मुस्कान आणि भूमीसोबत राहत होती. मुस्कान ही किरणच्या पहिल्या पतीपासूनची मुलगी आहे. पतीशी फारकत घेतल्यानंतर किरणने आशिषसोबत विवाह केला होता. भूमी ही या दोघांची मुलगी आहे. त्यांच्याकडेच शिवदयाल हा चालक म्हणून काम करीत होता. काही महिन्यांपासून आशिष आणि किरण यांच्यात वाद सुरू होता. सतत होणाऱ्या वादानंतर आशिषने वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आणि ते बंगलोर येथे राहण्यासाठी गेले होते. तर किरण ही तिच्या दोन्ही मुलींसोबत कांदिवली येथे राहत होती. आईमुळे वडील बंगलोरला गेले या रागातून भूमीने आपला प्रियकर चालक शिवदयालच्या मदतीने आईसह बहिणीच्या हत्येची योजना बनविली होती.

ठरल्याप्रमाणे बुधवारी रात्री तिची आई आणि बहीण बेडरुममध्ये झोपल्या होत्या. यावेळी शिवदयालने त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन त्यांची हत्या केली. त्यानंतर भूमीने आणि नंतर शिवदयालने घरातच आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही माहिती स्थानिक रहिवाशांकडून समजताच कांदिवली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून त्यात कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी हत्येसह आत्महत्येच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धाव घेऊन या चौघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. ही माहिती बंगलोर येथे राहणाऱ्या आशिष दळवी यांना देण्यात आली असून ते मुंबईला येण्यासाठी निघाले होते. सकाळी उघडकीस आलेल्या या दुहेरी हत्या आणि आत्महत्येच्या घटनेने कांदिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in