अपहरणाचा बनाव करून दीड वर्षांच्या मुलाची हत्या; आरोपी आईसह दुसऱ्या पतीला अटक व कोठडी

अपहरणाचा बनाव करुन दीड वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी आरोपी आईसह तिच्या दुसऱ्या पतीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली.
अपहरणाचा बनाव करून दीड वर्षांच्या मुलाची हत्या; आरोपी आईसह दुसऱ्या पतीला अटक व कोठडी
FPJ प्रातिनिधिक फोटो

मुंबई ­: अपहरणाचा बनाव करुन दीड वर्षांच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी आरोपी आईसह तिच्या दुसऱ्या पतीला मेघवाडी पोलिसांनी अटक केली. या दोघांविरुद्ध अपहरणासह हत्या, पुरावा नष्ट करणे आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अटक आरोपींमध्ये राजेश चैतन्य राणा आणि रिंकी राजेश राणा यांचा समावेश असून ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेमात अडथळा असल्याने या दोघांनी या मुलाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. राणा पती-पत्नी हे मूळचे ओरिसाचे रहिवाशी असून सध्या जोगेश्‍वरी परिसरात राहत होते.

रिंकीचा मृत मुलगा दीड वर्षांचा होता. तो त्यांच्या प्रेमसंबंधास अडथळा होता. तसेच तो स्वत:चा मुलगा नसल्याने राजेश हा त्याच्यावर सतत राग करत होता. अनेकदा राजेशसोबत रिंकी ही या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करत होती. दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून या दोघांनी या मुलाची लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यात त्याचा मृत्यू झाला होता. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने त्याचा मृतदेह घरात लपवून ठेवला होता. त्याचा मृतदेह घेऊन राजेशने नाल्यात फेकला. त्यानंतर त्याने रिक्षातून प्रवास करताना दोन अज्ञात व्यक्तीने त्याला बेशुद्ध करून दीड वर्षांच्या मुलाचे अपहरण केल्याचा बनाव केला. याबाबत त्याने मेघवाडी पोलिसांत तक्रार केली होती. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता.

या आदेशांनतर पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, एसीपी संपतराव पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मचिंछर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय सुधीर घाडगे, आनंद भगत, उपनिरीक्षक वर्षा ठुले, अंमलदार माने, ठाकूर, शेख, वरठा यांनी तपास सुरू केला होता. परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेतल्यानंतर अशी कुठलीही घटना घडली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे राजेशला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने व त्याची पत्नी रिंकीनेच दीड वर्षांच्या मुलाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हत्या केली आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह नाल्यात फेकून पलायन केले होते. त्यानंतर त्यांनी मुलाच्या अपहरणाचा बनाव करून पोलिसांत खोटी तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in