दोन रुपयांच्या वादातून खून; ८ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ५ वर्षांची शिक्षा जाहीर

शेअर रिक्षाचे भाडे १२ रुपये होते. सहानी यांनी रिक्षाचालकाला २० रुपये दिले. दोन रुपयांवरून निर्माण झालेला वाद विकोपाला जाऊन रिक्षाचालक चौहान याने सहानी यांना डोक्यावर ठोसे लगावले.
दोन रुपयांच्या वादातून खून; ८ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर ५ वर्षांची शिक्षा जाहीर

चारुल शहा-जोशी/ मुंबई

रिक्षाच्या भाड्यातील केवळ दोन रुपयांच्या वादातून प्रवाशाचा खून केलेल्या चालकाने गेली ८ वर्षे तुरुंगात काढली. त्यानंतर त्याच्या खटल्याची सुनावणी होऊन न्यायालयाने त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. २०१६ साली घडलेल्या या घटनेचा निकाल गेल्या आठवड्यात हाती आला असून तोपर्यंत आरोपीने दिलेल्या शिक्षेपेक्षा ३ वर्षे अधिक काळ कारागृहात घालवला आहे.

सरजूप्रसाद सहानी (४५) हे भगवती रुग्णालयाजवळील इमारतीत चौकीदार होते. १४ एप्रिल २०१६ रोजी ते पहाऱ्याची ड्युटी संपवून बोरिवली पूर्वेत राहणाऱ्या एका नातेवाईकाला भेटण्यास गेले. तेथून ते रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बोरिवली पश्चिमेकडील त्यांच्या घरी परतण्यास निघाले. त्यांनी रामपरवेश चौहान (२६) या रिक्षाचालकाची रिक्षा केली. घराजवळ परतल्यानंतर रिक्षाच्या भाड्यावरून वाद निर्माण झाला. शेअर रिक्षाचे भाडे १२ रुपये होते. सहानी यांनी रिक्षाचालकाला २० रुपये दिले. दोन रुपयांवरून निर्माण झालेला वाद विकोपाला जाऊन रिक्षाचालक चौहान याने सहानी यांना डोक्यावर ठोसे लगावले. त्यामुळे सहानी जमिनीवर कोसळले आणि डोक्याला गंभीर दुखापत होऊन ते बेशुद्ध पडले.

सरजूप्रसाद सहानी यांचे चिरंजीव राजन हे यावेळी घरी होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्या घरी येऊन त्यांना कळवले की, तुमच्या वडिलांना गणपत पाटील नांगर गल्ली नं.०१, बोरिवली (पश्चिम), मुंबई येथे कोणीतरी मारहाण करून जखमी केले आहे. राजन आणि त्यांच्या आईने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सहानी यांना कांदिवली येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सरजूप्रसाद यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, चौहानवर एमएचबी पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला आणि गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी चौहानवर खुनाचा गुन्हा दाखल केला. न्यायालयाने चौहान याला त्याला खुनाच्या आरोपातून मुक्त केले. सदोष मनुष्यवधाचा आरोप लावला. त्याला दोषी ठरवताना न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, आरोपीचा खून करण्याचा हेतू नव्हता. पण हाणामारीत जमिनीवर पडल्याने सहानी यांचा मृत्यू झाला. त्यासाठी न्यायालयाने चौहान याला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. मात्र, हा निकाल गेल्या आठवड्यात आला आहे. चौहान यांनी यापूर्वीच ८ वर्षे तुरुंगात काढली आहेत.

दफ्तरदिरंगाई

  • एप्रिल २०१६ मधील घटना

  • रिक्षाचालक आणि प्रवाशात

  • २ रुपयांवरून वाद

  • चालकाच्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू

  • चालकाला अटक आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

  • चालक ८ वर्षे तुरुंगात

  • २०२४ मध्ये न्यायालयाचा निकाल

  • ८ वर्षे कैदेत घालवल्यानंतर

  • ५ वर्षे शिक्षेची सुनावणी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in