कुरबुर आणि नाराजीचा धूर;शिरसाट सुसाट तर पंकजा म्हणतात, विच्छा माझी पुरी करा

शिंदे गटातील संजय शिरसाट व बच्चू कडू तर भाजपमधील पंकजा मुंडे यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी जाहीर केली आहे
कुरबुर आणि नाराजीचा धूर;शिरसाट सुसाट तर पंकजा म्हणतात, विच्छा माझी पुरी करा

बऱ्याच खटपटी व लटपटीनंतर सत्तारूढ झालेल्या भाजप व शिंदे गटाच्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर रडत-खडत नुकताच पार पडला. ज्याची भीती होती ती गोष्ट खरी ठरण्याची शक्यता गेल्या काही दिवसांतील घडामोडींवरून दिसून येत आहे. शिंदे गटातील काही आमदार हे मंत्रिपदाच्या आशेने शिवसेनेतून बाहेर पडले होते, तर भाजपचे अनेक जण कधी सत्तेत सहभाग मिळतो, यासाठी आसुसलेले होते. मंत्रिमंडळ विस्तारात यापैकी अनेकांना स्थान न मिळाल्याने त्यांनी आपली नाराजी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शिंदे गटातील संजय शिरसाट व बच्चू कडू तर भाजपमधील पंकजा मुंडे यांनी वेगवेगळ्या प्रकारे आपली नाराजी जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदे गट व भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिरसाटांचे सूचक ट्विट

आमदार संजय शिरसाट यांनी शुक्रवारी रात्री एका ट्विटद्वारे उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘कुटुंबप्रमुख’ म्हणून करून आपल्यापुढे ठाकरेंच्या गटात परतण्याचा मार्ग अजूनही खुला असल्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. ‘आगामी मंत्रिमंडळ विस्तारात आपला समावेश झाला नाही, तर आपल्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे आहेत,’ हेच त्यांनी या माध्यमातून दाखवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र नंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केले व मोबाइलमध्ये टेक्निकल प्रॉब्लेस झाल्याने चुकून आपण जुने ट्विट पोस्ट केल्याची सारवासारव केली.

माझी नाराजी स्वाभाविक - शिरसाट

“मी राजकारणात आहे मला पुढे जावे असे वाटते. माझी नाराजी स्वाभाविक आहे. त्याला मी नाकारू शकत नाही; पण त्यांनी माझी मनधरणी केली. आधीच तीन मंत्री आहेत; पण त्यांना योग्य वाटले तर ते निर्णय घेतील. मला राजकारणात ३८ वर्षे झाली. राजकारणात यावेळी मला संधी मिळायला हवी होती, लवकरच मला ती संधी मिळेल असेही सांगण्यात आले आहे,” असे सांगत संजय शिरसाट यांनी आपली नाराजी उघड केली आहे.

मंत्रिपद मिळाल्यास विकास करेन - पंकजा मुंडे

“मला मंत्रिपद मिळाल्यास मी विकास करेन,” असे म्हणत पुन्हा एकदा भाजपनेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त परळी येथे तिरंगा रॅलीत बोलताना पंकजा यांनी पुन्हा आपल्या मनातील खदखद जाहीर केली. त्या म्हणाल्या, “मी, थांबणार नाही, झुकणार नाही. मी पातळी सोडून कधीही शत्रूवर टीका केली नाही. माझ्या केसालाही धक्का लागणार नाही. संघर्षाला मी घाबरत नाही. सरकार आले; मात्र मंत्रिपद मिळाल्यास मी विकास करेन.”

घास हिरावू देणार नाही

“मला वाटतं की, घरी बसावे; पण तुमचे चेहरे डोळ्यांसमोर येतात. नेत्यांचे काम आणि आत्मसन्मान देणे आहे; मात्र हे काम जेव्हा बंद होईल, तेव्हा माझा राजकारणात अर्थ राहणार नाही. आपल्या तोंडचा घास कुणीही हिरावून घेणार नाही, याची काळजी करू. आपल्याला आता भक्कम उभे राहायचे आहे. लोकांनी रांगा लावण्यापेक्षा लोकांकडे जाणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यायचे आहे,” असे त्या म्हणाल्या.

पंकजांना २०२४ पर्यंत वाट पाहावी लागणार

भाजपनेत्या पंकजा मुंडे यांना नव्या सरकारमध्ये आगामी मंत्रिमंडळ विस्तारातही मंत्रिपद हुलकावणी देण्याची शक्यता आहे. मंत्रिपदाबाबतच्या त्यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना संयम पाळण्याचा सल्ला दिल्याचे समजते. ‘सध्या महाराष्ट्रात पक्षाचे बडे नेते सक्रिय आहेत. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत यातील अनेक जण सक्रिय राजकारणातून बाहेर होतील. पंकजांना तिची वेळ येण्यासाठी धीराने थोडे थांबावे लागेल, असे भाजपच्या विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in