१३ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी संगीत शिक्षकाला अटक

विशेष सेशन कोर्टाने आरोपी शिक्षकास पोलीस कोठडी सुनावली आहे.
१३ वर्षांच्या विद्यार्थिनीच्या विनयभंगप्रकरणी संगीत शिक्षकाला अटक

मुंबई : तेरा वर्षांच्या विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका २६ वर्षांच्या संगीत शिक्षकाला चारकोप पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ सिंग असे या शिक्षकाचे नाव असून, त्याच्यावर विनयभंगासह पोक्सोच्या कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सिद्धार्थ सिंग हा कांदिवलीतील एका नामांकित शाळेत संगीत शिक्षक म्हणून कामाला आहे. याच शाळेत सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षांच्या विद्यार्थिनीसोबत त्याची सोशल मिडीयावरून ओळख झाली होती. त्यांच्यात व्हॉटअपच्या माध्यमातून संभाषण सुरू होते. त्यात काही अश्‍लील संभाषण झाल्याचे मुलीच्या पालकांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे त्यांनी सिद्धार्थची समजूत काढून त्याला योग्य ती समज दिली होती. तरीही ते दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्यामुळे मुलीच्या पालकांनी मंगळवारी रात्री चारकोप पोलिसांत सिद्धार्थविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध विनयभंगासह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर त्याला विशेष सेशन कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in