'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन

निवडणुकीतील गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १ नोव्हेंबरला मनसेसह ‘मविआ’ एकत्र येऊन निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
'मविआ'चा एल्गार; EC विरोधात १ नोव्हेंबरला विराट मोर्चा; एक कोटी घुसखोर मतदार कमी करा! केंद्रीय गृहमंत्र्यांना विरोधकांचे आवाहन
Photo : X (X/ @ShivSenaUBT_)
Published on

मुंबई : राज्यातील मतदार याद्यांमध्ये त्रुटी असून, लाखो बोगस मतदारांची नावे घुसवण्यात आल्याचा आरोप करत मनसेसह ‘मविआ’ने एकत्रित येऊन निवडणूक आयोगाविरोधात एल्गार पुकारला आहे. निवडणुकीतील गैरप्रकारांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी १ नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मुंबईत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने नुकतीच निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या भेटीत विरोधकांनी मतदारयाद्यांमधील त्रुटी आयोगासमोर मांडल्या. मात्र, आपले समाधान न झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यानंतर रविवारी राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रात ९६ लाख बोगस मतदार असल्याचा मोठा दावा केला. यानंतर सर्वपक्षीय विरोधकांची शिवसेना भवनात पत्रकार परिषद पार पडली. या परिषदेत निवडणूक आयोगाविरोधात मुंबई भव्य मोर्चा काढणार असल्याची घोषणा करण्यात आली. तसेच राज्यात एक कोटी घुसखोर मतदार कमी करा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केले.

या परिषदेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, मनसे नेते बाळा नांदगावकर, काँग्रेसचे सचिन सावंत, माकपचे प्रकाश रेड्डी आदी नेते उपस्थित होते.

आगामी काळातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदार याद्यामध्ये घोळ झाला असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीसह मनसेच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला घेरले होते व या घोळाची चौकशी करावी, अशी मागणी केली होती. याची दखल घेत मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी मतदार याद्यांमधील गोंधळाचा शोध घेण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात महाराष्ट्रात जवळपास ४१ लाख मतदार वाढले होते, असे राहुल गांधी यांनी याआधीच सांगितलेले आहे. १६ ते १९ ऑक्टोबर या चार दिवसांत महाराष्ट्रात सहा लाख ५५ हजार मतदार वाढले, असा दावा सचिन सावंत यांनी केला आहे. यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील म्हणाले की, आमची अपेक्षा आहे निवडणूक आयोगाने वेळीच त्यांच्या चुका दुरूस्त कराव्यात.

निवडणूक आयोगाने समाधानकारक उत्तर दिलेले नाही. दुबार मतदार काढण्यासाठी काय कार्यक्रम हाती घेणार? ज्यांचे पत्ते नाहीत, त्यांचे तुम्ही काय करणार आहात? हा खुलासा आयोगाने करावा. आयोग अनेक गोष्टी दडवून ठेवत आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी यावेळी केला.मतदार यादीमधील घोळ ही भावना लोकांच्या मनात आहे. स्वतः आमदारसुद्धा ते बोलत आहेत. निवडणूक आयोगाला आम्ही पत्र दिले होते. त्यानंतर चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. याचा अर्थ घोळ झाला आहे. आता ते थातुरमातुर उत्तरे देत आहेत. मोर्चात आम्ही पक्षाच्यावतीने सामील होऊ, असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

शरद पवार, उद्धव, राज ठाकरे मोर्चाचे नेतृत्व करणार

निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्यावतीने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या गावा-गावातून, जिल्ह्या-जिल्ह्यातून लाखो लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत आणि मतदारांची जी ताकद आहे, ती देशांच्या पंतप्रधानांना आणि निवडणूक आयोगाला दाखवली जाईल. या मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते करतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in