महापुरुषांबद्दल होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेध म्हणून आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीकडून (MVA Protest) जाहीर महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये हजारो लोकांनी सहभाग घेतला असून महाविकास आघाडीचे सर्व बडे नेते या महामोर्चात सहभागी राहणार आहेत.
मुंबईच्या भायखळा इथल्या रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनीपासून या महामोर्चाची सुरुवात झाली. या महामोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त मुंबईत तैनात करण्यात आला आहे. तसेच, ड्रोनच्या सहाय्याने महामोर्चावर पोलिसांची करडी नजर आहे.
या मुद्द्यांसाठी महाविकास आघाडीने काढला महामोर्चा
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पदावरून दूर करण्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. तसेच, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही या महामोर्चात करण्यात येत आहे.
या महामोर्चामध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार संजय राऊत, सपाचे अबू असीम आजमी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेदेखील महामोर्चात सहभागी झाले आहेत. महाविकास आघाडीचे हजारो कार्यकर्त्ये राज्यभरातून मुंबईत या महामोर्चात सहभागी झाले आहेत.