'मविआ'त बिघाडी; काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; भाजप व ठाकरे सेनेविरोधात काँग्रेस मैदानात, रमेश चेन्नीथला यांचा एल्गार

महाविकास आघाडीसोबत 'मनसे नकोच' यावर ठाम राहत अखेर काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. 'एकला चलो रे'चा नारा देत काँग्रेसने भाजप व ठाकरे बंधुंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.
'मविआ'त बिघाडी; काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; भाजप व ठाकरे सेनेविरोधात काँग्रेस मैदानात, रमेश चेन्नीथला यांचा एल्गार
'मविआ'त बिघाडी; काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; भाजप व ठाकरे सेनेविरोधात काँग्रेस मैदानात, रमेश चेन्नीथला यांचा एल्गारPhoto : X (Mmbai Congress)
Published on

मुंबई : महाविकास आघाडीसोबत 'मनसे नकोच' यावर ठाम राहत अखेर काँग्रेसने मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. 'एकला चलो रे'चा नारा देत काँग्रेसने भाजप व ठाकरे बंधुंविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी शनिवारी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले.

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीची जागावाटपावर चर्चा सुरू असून मविआत मात्र बिघाडी झाली आहे. महाविकास आघाडीसोबत मनसेला घेण्यास काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून विरोध दर्शवला होता. तरीही भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढावे, अशी साद मविआच्या नेत्यांनी काँग्रेसला घातली होती. मात्र, काँग्रेसने मनसेसोबत जाण्यास स्पष्ट नकार देत मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस, महायुती आणि महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे.

राज्यातील महापालिकांच्या निवडणुकींचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून, १६ जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहेत.

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीनंतर रमेश चेन्नीथला यांनी आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची माहिती दिली.

मुंबई महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, मुंबईचा हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात लढण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू. आम्ही याबाबतचा जाहीरनामा तुमच्यासमोर लवकरच सादर करू, त्यामुळे मतदारांनी आम्हाला साथ द्यावी, आम्ही मुंबईचा विकास करु, असा विश्वास चेन्नीथला यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राज्यात काही ठिकाणी गरज पडल्यास स्थानिक पातळीवर कुणाशी युती करायची याचा निर्णय तेथील स्थानिक नेतृत्वाने घ्यावा, अशी सूचनाही चेन्नीथला यांनी केली.

मनसे, ठाकरे, शरद पवारांचा एकत्र लढण्यावर भर

महाविकास आघाडीपासून दूर जात काँग्रेसने मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला असताना उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने एकत्र निवडणुकीत लढण्यावर भर दिला आहे. त्यादृष्टीने या तिन्ही पक्षांच्या हालचाली सुरू असून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे 'मविआ 'तील सूत्रांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in