माझ्या निघून जाण्याने नाहक गैरसमज पसरविण्यात आला- अजित पवार

दादरमधील वादात रिव्हॉल्व्हर काढण्यापर्यंत मजल गेली हे काय यूपी-बिहार आहे काय, गृहमंत्री काय करत आहेत
माझ्या निघून जाण्याने नाहक गैरसमज पसरविण्यात आला- अजित पवार

“पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी बोलणं अपेक्षित असतं, त्यामुळे मी बोलणं टाळलं; मात्र माध्यमांनी नेहमीप्रमाणे वेगळा अर्थ काढला. वास्तविक मला तिथे कुणी बोलू नका, असं सांगितलं नव्हतं. कारण नसताना गैरसमज पसरविण्यात आला,” असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले. “दादरमधील वादात रिव्हॉल्व्हर काढण्यापर्यंत मजल गेली हे काय यूपी-बिहार आहे काय, गृहमंत्री काय करत आहेत,” असा सवालही त्यांनी केला.

लम्पीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. “मी नास्तिक नाही; परंतु राज्याच्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने दर्शनासाठी किती वेळ घालवायचा त्यालापण काही मर्यादा असतात,” असा टोलाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले होते. त्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भाषणाची संधी आधी दिल्याने अजित पवार व्यासपीठावरून नाराज होऊन निघून गेले, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांचे अजित पवार यांनी विधानभवन येथे पत्रकारपरिषद घेऊन खंडन केले. “मी, १९९१ साली पहिल्यांदा खासदार झालो. म्हणजे ३१ वर्षे झाली. तेव्हापासून सहसा मी राष्ट्रीय पातळीवर उपस्थित राहतो; पण मार्गदर्शन करत नाही. राज्यात सभा, मेळाव्यांना मी मार्गदर्शन करतो. पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय नेते व प्रदेशाध्यक्ष यांनी बोलणं अपेक्षित असतं, त्यामुळे मी बोलणं टाळलं; पण माध्यमांनी त्याचा वेगळा अर्थ लावला. मी एकटाच बोललो नाही असं नाही, तर वेळेअभावी सुनील तटकरे, खासदार वंदना चव्हाण बोलू शकले नाहीत. दोन वेळा वॉशरूमला गेलो म्हणून वेगळा विषय चालवण्यात आला. कारण नसताना गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. वस्तुस्थिती आधारित बातम्या देण्याची जबाबदारी माध्यमांची आहे,” असे अजित पवार म्हणाले.

लम्पी : दूध उत्पादनाचा प्रश्न गंभीर होण्याची भीती

 महाराष्ट्रातील पशुधनालाही विषाणूजन्य लम्पी त्वचारोगाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. सद्य:स्थितीत राज्यातल्या १७ जिल्ह्यांतल्या ५९ तालुक्यांत हजारो जनावरे लम्पी आजाराने ग्रस्त असून, त्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. पशुधनांमधील लम्पीचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी दूधउत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती आणि जनावरांच्या लसीकरणाचा व्यापक कार्यक्रम राज्य सरकारने हाती घ्यावा. लम्पीग्रस्त जनावरांच्या दुधाबद्दल नागरिकांच्या मनात असलेला संभ्रम, भीती दूर करण्यासाठी मोहीम राबवावी, अशी मागणी अजित पवार यांनी केली. तातडीने लसीकरण मोहीम राबविण्यात यावी. लसींचा तुटवडा असेल तर परदेशातून लस आयात करावी. लम्पी आजाराने पशुधन गमावलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून भरपाई मिळावी. पशुधनाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्जवसुली होऊ नये. या आजाराला विमा संरक्षण नसल्याने ते मिळवून देण्यासाठी सरकारने विमा कंपन्यांशी चर्चा करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

१८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारला नाही

“राज्यातील विद्यमान सरकारला अडीच महिने होत आले, तरी मंत्रिमंडळाचा पूर्ण विस्तार झालेला नाही. जिल्ह्यांना पालकमंत्री नेमलेले नाहीत. १८ पैकी १४ मंत्र्यांनी अजून कार्यभार स्वीकारलेला नाही. मंत्रालयात लोकांची कामे खोळंबली आहेत. मंत्र्यांच्या कार्यालयात फायलींचा डोंगर साठला आहे. मुख्यमंत्री प्रशासकीय कामे सोडून घरोघरी फिरतायत. राजकीय सभा घेतायत. मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सभेसाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यात आले आहे. अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मदतनिसांनी राजकीय सभेला उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.”

- अजित पवार, विरोधी पक्षनेते

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in