नायर रुग्णालयातील महाविद्यालय इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार; पालिका ७१ कोटी ३० लाख खर्चणार

वास्तुशास्त्रीय सल्लागार तालिकेतील मे. आर्चिलॅब डिझाईन्स यांची वास्तुशास्त्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली.
 नायर रुग्णालयातील महाविद्यालय इमारतीची दुरुस्ती करण्यात येणार; पालिका 
७१ कोटी ३० लाख खर्चणार

मे. आरपीएफ इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. या कंत्राटदाराला रस्ते विभागाने केलेल्या चौकशीनंतर तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले होते; मात्र पुन्हा एकदा काळ्या यादीतील कंत्राटदाराचा पालिकेत प्रवेश झाला असून नायर रुग्णालयातील महाविद्यालय इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरणाचे काम या कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. या कामासाठी पालिका तब्बल ७१ कोटी ३० लाख ५७ हजार १०८ रुपये खर्चणार आहे.

अधिष्ठाता (एन व टी) यांच्याकडून टोपीवाला राष्ट्रीय महाविद्यालयाच्या संरचनात्मक दुरुस्ती, नुतनीकरण व दर्जेन्नती करण्याबाबतचा प्रस्ताव या विभागास दिला होता. त्यानुसार महापालिका वास्तुशास्त्रज्ञ विभागाने मनपा ठराव क्र.८४ २२ एप्रिल २०१५ नुसार मंजुर करण्यात आलेल्या वास्तुशास्त्रीय सल्लागार तालिकेतील मे. आर्चिलॅब डिझाईन्स यांची वास्तुशास्त्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली.

वास्तुशास्त्रीय सल्लागाराने विभागाच्या आवश्यकतेनुसार अंतर्गत पुनर्रचना, अतिरिक्त खोल्या, उपस्कर (फर्निचर) रचना यासाठीचे सुधारित आराखडे तयार केले. त्या आराखड्यास उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) विशेष कक्ष यांची मंजुरी प्राप्त झाली आहे. तसेच इमारत सुमारे ५० वर्षे जुनी असल्यामुळे सदर सल्लागाराने संरचनात्मक सल्लागार मे. बी. जे. मेहता अॅड असोसिएट्स यांच्याकडून इमारतीचे संरचनात्मक परिक्षण करून घेतले. त्यामुळे आता महाविद्यालय इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

असा झाला पुन्हा प्रवेश

मे. आरपीएफ इन्फ्राप्रोजेक्टस प्रा.लि. मुंबई महापालिकेतील नोंदणीकृत कंत्राटदार होते. रस्ते विभागाने केलेल्या चौकशीनंतर २२ मार्च २०१७ पासून तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले होते; मात्र २ नोव्हेंबर २०२१ मध्ये पालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर या कंत्राटदारास एसआरएम आयडी देण्यात आली आहे. त्यामुळे या कंत्राटदाराला निविदा प्रक्रियेत सहभागी होता आले असून २२ जून २०२२ रोजी नायर रुग्णालयातील महाविद्यालय इमारतीची दुरुस्ती व नुतनीकरण कामाच्या निविदा प्रक्रियेत अर्ज केल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in