
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका संचलित नायर रुग्णालयाला राष्ट्रीय प्रमाणिकरण मंडळ अर्थात 'एनएबीए'च कडून प्रमाणित दर्जा मिळाला आहे. शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये एनएबीएच प्रमाणित दर्जा मिळवणारे नायर रुग्णालय हे राज्यातील पहिले रूग्णालय ठरले आहे.
एनएबीएचकडून प्रमाणिकरण दर्जा प्रदान करताना रूग्णांना लागणारा उपचाराचा कालावधी (टर्न अराऊंड टाईम), संसर्ग नियंत्रण (इन्फेक्शन कंट्रोल), स्वच्छ (स्टरलाईज) उपकरणांचा वापर, जैववैद्यकीय सूचकांचा (बायोलॉजिकल इंडिकेटर) वापर आदी निकष रूग्णसेवेच्या अनुषंगाने तपासण्यात आले. रूग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये गुणवत्ता आणि हमी या दोन्ही गोष्टींची पडताळणी यानिमित्ताने करण्यात आली.
रूग्णालयाच्या ठिकाणी दिव्यांगांसाठी सुलभ प्रसाधनगृह, उतार (रॅम्प), व्हिलचेअर आदी सर्व सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यासह रूग्णांच्या सुविधेसाठी चिन्हांचा वापर, रांग व्यवस्थापनासाठी 'टोकन सिस्टिम'चा वापर, महत्त्वाच्या वैद्यकीय सेवांसाठी रूग्णांची लिखित परवानगी (कन्सेंन्ट), रूग्णांना भूल देताना चाचण्यांचा समावेश आदी बाबींची पडताळणीही या मान्यतेच्या निमित्ताने करण्यात आली. याअनुषंगाने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा आणि उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे यांच्या देखरेखीखाली सर्व कार्यवाही पूर्ण केली.
रुग्णांना वैद्यकीय उपचारादरम्यान रुग्णालयात देण्यात येणारी औषधे, औषधांचा साठा, ज्वलनशील पदार्थ ठेवण्याची पद्धत आणि तेथील उपाययोजना आदी बाबीही यानिमित्ताने तपासण्यात आल्या. गत दीड वर्षापासून 'एनएबीएच' मान्यतेसाठी रुग्णालय प्रशासनामार्फत तयारी सुरू होती. रुग्णालयाने 'एनएबीएच' दर्जा मिळवण्याच्या अनुषंगाने सर्व निकष पूर्ण केल्यामुळेच नायर रुग्णालय आणि दंत महाविद्यालयाला हा मान मिळाला आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी परिचारिका, कक्ष परिचर (वॉर्डबॉय), कामगार, कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर्स, विद्यार्थी असे सर्वांनीच प्रयत्न केले.
- डॉ. नीलम अंद्राडे, अधिष्ठाता, नायर रुग्णालय