

मुंबई : नालासोपारा येथील एमडी ड्रग तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा घालून मुंबई पोलिसांनी १३ कोटी ४४ लाखांचे एमडी ड्रग हस्तगत केले. याप्रकरणी एकूण पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
परिमंडळ सहामधील पोलीस अधिकाऱ्यांना ५ ऑक्टोबरला एक इसम अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी टिळक नगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी रचलेल्या सापळ्यात त्या इसमाकडे ५७ ग्रॅम मेफेड्रॉंन सापडले. त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने त्याच्या तीन साथीदारांची माहिती दिली. त्यांनाही मुंबई आणि मिरा रोड येथून अटक करण्यात आली.
आरोपींनी नालासोपारा येथील पेल्हार गावातील रशीद कंपाऊंडमध्ये एमडी तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती दिली. त्यावरून त्या कारखान्यावर छापा घालून एका आरोपीला अटक करण्यात आली व कारखान्यातून सहा किलो एमडी ड्रग जप्त करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून आणखी काही आरोपींना पकडण्यात येईल, अशी माहिती परिमंडळ सहाचे पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी दिली.