एसटी प्रवाशांनाही लागणार वाचनाची आवड; नालासोपारा आगारात फिरते वाचनालय सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रवाशांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच राज्य आणि देशाच्या महापुरुषांचे कार्य, इतिहास व प्रेरणादायी विचार युवा पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने राज्यभरात फिरते वाचनालया उभारण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे.
एसटी प्रवाशांनाही लागणार वाचनाची आवड; नालासोपारा आगारात फिरते वाचनालय सुरु
एसटी प्रवाशांनाही लागणार वाचनाची आवड; नालासोपारा आगारात फिरते वाचनालय सुरुX
Published on

वसई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त प्रवाशांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी तसेच राज्य आणि देशाच्या महापुरुषांचे कार्य, इतिहास व प्रेरणादायी विचार युवा पिढीपर्यंत पोहोचावेत, या उद्देशाने राज्यभरात फिरते वाचनालया उभारण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. त्याच संकल्पनेतून एसटीच्या नालासोपारा बस आगारात फिरते वाचनालय हा अभिनव उपक्रम आज सुरू करण्यात आला.

एसटी बसने प्रवास करणारे अनेक प्रवासी बस आगारात बसची प्रतीक्षा करत असतात. अशा प्रतीक्षेच्या वेळेचा सदुपयोग व्हावा आणि प्रवाशांना सहज उपलब्ध स्वरूपात ज्ञानवर्धक साहित्य वाचता यावे, या हेतूने फिरते वाचनालय सुरू करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पवित्र पर्वावर नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन नाईक यांच्या हस्ते या फिरत्या वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी आगार व्यवस्थापक नवनीत गावीत व एसटी महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

वाचनालयासाठी विविध पुस्तके व साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल आगार व्यवस्थापक नवनीत गावीत यांनी आमदार राजन नाईक यांचे आभार मानले.

या वेळी भाजप वसई-विरार जिल्हा महामंत्री मनोज बारोट, नगरसेवक जयप्रकाश वझे, मंडल अध्यक्ष सतीश सिंह, जितेंद्र नाईक, आगार व्यवस्थापक नवनीत गावीत, स्थानक प्रमुख निखिल सावळे, कार्यशाळा अधीक्षक अभिषेक बट, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अनिल पाटील यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.

प्रवाशांच्या वेळेचा ज्ञानवर्धक उपयोग

आमदार राजन नाईक यांनी उपक्रमाचे कौतुक केले. प्रवाशांच्या प्रतीक्षेच्या वेळेचा सकारात्मक आणि ज्ञानवर्धक उपयोग करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. हे फिरते वाचनालय नागरिकांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरेल आणि प्रवाशांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यास निश्चितच हातभार लावेल, अशी अपेक्षा आमदार नाईक यांनी व्यक्त केली.

logo
marathi.freepressjournal.in