

मुंबई : वीर सावरकर यांच्या नावावरून भाजप विरुद्ध काँग्रेस नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकतात. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला चिमटा काढण्यासाठी भाजपने भविष्यात होणाऱ्या वांद्रे- वर्सोवा कोस्टल रोडला वीर सावरकरांचे नाव द्या, अशी सोशल मीडियावर जाहिरातबाजी केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारात वीर सावरकर यांच्या नावाचा वापर केला जातोय, अशी चर्चा रंगू लागली आहे.
सन २०२४ ची विधानसभा निवडणूक सगळ्याच राजकीय पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी निकाल आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू आहे. महायुती व मविआकडून विविध आश्वासनांचा पाऊस पाडला जात आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यात काँग्रेस पक्षाला डिवचण्यासाठी भाजपने आपल्या प्रचारात स्वातंत्र्यवीर सावरकरांना घेतले आहे. प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याला नमन करणारा देवाभाऊ!, महापुरुषांच्या आदर्शाचे स्मरण ठेवण्यासाठी हवी महायुती! अशी सोशल मीडियावर जाहिरातबाजी केली जात आहे.
ऐन निवडणुकीत काँग्रेसला चिमटा
वांद्रे-वर्सोवा सागरी सेतूसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, गान सम्राज्ञी लता मंगेशकर, इंदिरा गांधी, उद्योगपती रतन टाटा व अन्य काही नेत्यांची नावे देण्याची मागणी राजकीय पक्षांची आहे. पण या रस्त्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्याची मागणी भाजपने सोशल मीडियावरील जाहिरातीतून केली आहे. ऐन निवडणुकीमध्ये वीर सावरकरांच्या नामकरणाचा मुद्दा उपस्थित करत भाजपने काँग्रेस पक्षाला चिमटा काढला आहे.