
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी त्यांचे पुत्र माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात काही बांधकाम व्यावसायिक आणि राजकारण्यांची नावे घेतली आहेत. त्यांनी वांद्रे येथील झोपडपट्टी विकास प्रकल्पांशी संबंधित समस्यांकडे पोलिसांचे लक्ष वेधले आहे. एका विकासकाने त्यांच्या वडिलांविरोधात अपशब्द वापरले होते, असे झिशान सिद्दीकी यांनी पोलिसांना सांगितले.
झिशान सिद्दीकी यांनी दावा केला आहे की, अनेक विकासक झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांसाठी सतत त्यांच्या वडिलांच्या संपर्कात राहत असत. त्यांचा हा जबाब सिद्दीकी हत्येशी संबंधित दाखल केलेल्या आरोपपत्राचा भाग आहे.
काही विकासक माझ्या वडिलांच्या नियमित संपर्कात होते. माझ्या वडिलांना त्यांच्या दैनंदिन कामांविषयी डायरी लिहिण्याची सवय होती. हत्येच्या दिवशी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान मोहित कांबोज (भाजप कार्यकर्ता) यांनी माझ्या वडिलांशी वांद्रे येथील मुंद्रा बिल्डर्सच्या प्रकल्पाबाबत भेट घेण्यासाठी व्हॉट्सॲपवरून संपर्क साधला होता, असे झिशान सिद्दीकी यांनी जबाबात नमूद केले आहे.
माझ्या वडिलांच्या विरोधात खोटा खटला दाखल केला होता, असेही त्यांनी सांगितले.