नाना पटोले यांनी केला केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप
महाविकास आघाडीच्या आमदारांना फोन करून धमकावण्याचा प्रयत्न केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे, असा आरोप शनिवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. विधानपरिषद निवडणुकीत केंद्रीय तपास यंत्रणाचा दुरुपयोग सुरू आहे. आमदारांना धमकावल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. ज्या प्रकारे ते फोनवर आमच्या आमदारांशी बोलतात, ती भाषा ऐकली तर विरोधकांना केंद्रातील सत्तेची मस्ती आली आहे. आमच्याकडे या साऱ्या प्रकाराची रेकॉर्डिंग असून योग्य वेळ आल्यावर सर्व पुरावे समोर आणू, असा इशाराही त्यांनी दिला.
मतदानाच्या अधिकारापासून वंचित करण्याचे काम ज्या पद्धतीने सुरू आहे. ते पाहता या पद्धतीची लोकशाही असू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश न्याय मिळवण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन संरक्षण देण्याची मागणी करतात, याचा अर्थ आपला देश कुठल्या दिशेने चालला आहे, याचा अंदाज सगळ्यांना यायला पाहिजे, असे पटोले म्हणाले.
पटोले म्हणाले की, योग्य वेळी आम्ही जनतेसमोर ही भूमिका मांडणार आहोत. आमच्याकडे त्याची रेकॉर्डिंगही आहे. ईडी आणि सीबीआयचा दुरुपयोग सुरू आहे. ते आम्हाला या निवडणुकीच्या तोंडावर लक्षात आले आहे. आम्हाला मतदान करा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू, अशा धमक्या आमच्या आमदारांना आलेल्या आहेत. ही परिस्थिती लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. भाजपने कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी महाविकास आघाडीचे सर्व सहा उमेदवार विधान परिषदेवर निवडून येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आम्ही केलेय ‘स्टिंग ऑपरेशन’!
राज्यसभा निवडणुकीत आणि आता विधानपरिषद निवडणुकीत देखील भाजप तपास यंत्रणाचा वापर करत आहे. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही नक्कीच जिंकू. त्यानंतर मात्र, जनतेसमोर या सर्व क्लिप आम्ही आणू. महाविकास आघाडीने केंद्रीय तपास यंत्रणांचे आणि भाजपचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याचेही त्यांनी सांगितले.


