कोकणात नाणार रिफायनरी होणारच;केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ग्वाही

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प गेली सात वर्षे चर्चेत आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे
कोकणात नाणार रिफायनरी होणारच;केंद्रीय मंत्री नारायण राणेंची ग्वाही

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सध्या शिंदे-फडणवीस सरकारवर चौफेर टीका होत आहे. त्यातच आता कोकणात नाणार रिफायनरी होणारच, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे. वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर नाणार रिफायनरी प्रकल्पही दुसऱ्या राज्यात जाऊ शकतो का? या माध्यमांच्या प्रश्नावर नारायण राणेंनी हे उत्तर दिले आहे. ठरलेल्या ठिकाणीच नाणार रिफायनरी होणार असून, या प्रकल्पाला कोणाचाही विरोध चालू देणार नाही. याविषयी आम्ही काही केंद्रीय नेत्यांच्या संपर्कात असून संबंधित कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती राणे यांनी दिली आहे.

नाणार येथील तेलशुद्धीकरण प्रकल्प गेली सात वर्षे चर्चेत आहे. या प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. नाणार येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्प पर्यावरण आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यामुळे बारगळल्यानंतर हा प्रकल्प राजापूर तालुक्यातील बारसू गाव परिसरात १३ हजार एकरवर उभारण्याचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षाच्या सुरुवातीला पाठवला होता. या प्रस्तावाबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित आहे.

‘रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड’ (आरआरपीसीएल) हा ६० दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा प्रकल्प रत्नागिरीतील नाणार येथे होणार होता.

टप्प्याटप्प्याने प्रकल्प राबवणार

उद्योग खात्याच्या सूत्रांनी सांगितले की, हा प्रकल्प ६० दशलक्ष टन उत्पादन क्षमतेचा आहे. तरीही पहिल्या टप्प्यात केवळ २० दशलक्ष टन उत्पादन क्षमतेचा प्रकल्प राबवण्यात येईल. त्यानंतर परिस्थिती पाहून या प्रकल्पाचा विस्तार करण्यात येईल. या प्रकल्पाला १५ हजार एकरऐवजी ५५०० एकर जमीन लागेल. बारस, धोपेश्वर, पन्हाळे, नाटे, वाडा तिवरे, वाडा पन्हेरे येथील गावकऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in