
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गांभीर्याने आणि वेळेत पूर्ण होत नसेल तर संबंधित ठेकेदारांचा ठेका रद्द करा, अशा शब्दात अधिकाऱ्यांना नारायण राणे यांनी ठणकावले व ठेकेदारांचा हलगर्जीपणा अजिबात खपवून न घेण्याच्या सूचना केल्या. शनिवारी खासदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खातेनिहाय आढावा बैठक संपन्न झाली. बैठकीला जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, आदींसह विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पहिल्या पावसातच लांजा येथील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा बोजवारा उडाला होता. नागरिक आणि वाहनचालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. यावेळी बैठकीत खा. राणे यांनी महामार्ग आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणाबद्दल तीव्र शब्दात नापसंती व्यक्त करताना वेळेत योग्य काम करत नसेल तर त्याचा ठेका रद्द करा, काम योग्य होण्यासाठी अधिकाऱ्यांनी देखील प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहून ठेकेदार काय काम करतोय, किती माणसं आहेत, योग्य पद्धतीने काम होते आही की नाही? याची खात्री करा आणि त्याचा अहवाल द्यावा, पावसाळा येत्या ७ जूनपासून सुरू होत आहे, तोपर्यंत उर्वरित कामे पूर्ण झाली पाहिजे, यासाठी नियोजन करा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या ग्रामीण रस्त्यांची काय स्थिती आहे, त्यातील किती खराब आहेत याचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला केल्या. नैसर्गिक आपत्ती काळात प्रशासनाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावे. तसेच मान्सूनपूर्व सर्व कामे पूर्ण करावी, शाळा सुरू होण्यापूर्वी त्या सर्व शाळांची दुरुस्ती योग्य पद्धतीने करण्याबाबत आदेश देतानाच शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करून योग्य ती खबरदारी घ्यावी, या पावसाळ्यात छप्पर गळतीमुळे शाळा बंद अशी माहिती किंवा बातमी येता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
आता हापूस आंबा बर्फी तयार करावी
आंतराष्ट्रीय बाजारपेठेत रत्नागिरी हापूसला प्रचंड मागणी असून मोठी आर्थिक उलाढाल होत असते आता नागपूरची जशी संत्रा बर्फी प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर रत्नागिरीची हापूस आंबा बर्फी आपण तयार करूया आणि आपण नावारूपाला आणूया. काजू बर्फी बरोबरच आंबा बर्फीही खवय्यांना आवडेल, असा आशावाद नारायण राणे यांनी व्यक्त करून कल्पकता आणि विकासाचा दृष्टिकोन यांचा संगम म्हणजे कोकण विकास अशा शब्दात हापूस आंब्याचे महत्त्व वाढविणे गरजेचे असून या हापूस बर्फीसाठी कशा प्रकारे नियोजन करता येईल, याबाबत अधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची सूचना खासदार राणे यांनी प्रशासनाला केल्या.
रत्नागिरी जिल्हा टँकरमुक्त करा
उन्हाळ्यातील पाणीटंचाईबद्दलही खा. राणे यांनी विशेषत्वाने आढावा घेतला. यंदा रत्नागिरी जिल्ह्यातील ३७ गावांतील ९० वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागला आहे. मात्र आता रत्नागिरी जिल्हा पूर्ण टँकरमुक्त होण्यासाठी प्रयत्न करा, त्यासाठी पुढच्या वर्षीचे नियोजन आतापासूनच करा, गाव आणि वाडीवर असलेले पाणी स्त्रोत शोधून तेथून जनतेला कशा पद्धतीने मुबलक पाणीपुरवठा करता येईल आणि पाणीटंचाई कायमची कशी संपुष्टात येईल, यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश खा. राणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.