"साहेब! मला माफ करा"; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंचे गुरुस्मरण

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व्यक्त केल्या भावना
"साहेब! मला माफ करा"; शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त नारायण राणेंचे गुरुस्मरण

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. यानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचे आयपजन करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. अशामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट करत त्यांच्याविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये भेटू न शकल्याचे खंतदेखील त्यांनी व्यक्त केली आहे. राणेंनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे की, "बाळासाहेबांच्या काम करण्याच्या खास पद्धतीमुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळालेली होती. असे व्यक्तिमत्त्व माझ्या गुरूस्थानी आहे, हे सांगताना मलाही अभिमान वाटत असे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

नारायण राणे या पोस्टमध्ये म्हणाले आहेत की, "बाळासाहेब अतिशय दयाळू स्वभावाचे असून ते पक्के राजकारणी कधीच नव्हते. आपले माणूसपण त्यांनी शेवटपर्यंत जपले होते. त्यांनी आपल्या माणसांची नेहमीच काळजी घेतली. दुःखाच्या प्रसंगी विचारपूस करायला ते कधीही विसरले नाहीत. अशा वागणुकीमुळेच ते आपल्या फक्त पक्षाचेच नाही, तर अवघ्या महाराष्ट्राचे लाडके नेते होते. मी आज जो आहे, तो फक्त बाळासाहेबांमुळेच आहे. माझ्या राजकीय यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शाखा प्रमुख, मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेता असा माझा जो प्रवास आहे, तो केवळ त्यांच्यामुळेच शक्य झाला आहे." अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

त्यानंतर नारायण राणे यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय का घेतला? याबद्दलही लिहिले आहे. ते म्हणाले की, "आपल्या शेवटच्या दिवसात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. मला वाटले होते की, यावेळीही मृत्यूला चकवून तुम्ही बरे व्हाल. पण ते आपल्यातून निघून गेले. मी घेतलेल्या निर्णयाने त्यांना खूप यातना झाल्या असणार आणि त्याबद्दल मला आजन्म दुःख राहणार आहे. पण त्या परिस्थितीत माझा नाईलाज होता. काही लोकांमुळे मला तो निर्णय घेणे भाग पडले. आता त्याबद्दल बोलून काही अर्थ नाही"

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in