जैनांची नगरीवरून नरेंद्र मेहतांचा माफीनामा

मीरा-भाईंदरला ‘जैनांची नगरी’ आणि ‘मिनी राजस्थान’ असा उल्लेख करणाऱ्या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
जैनांची नगरीवरून नरेंद्र मेहतांचा माफीनामा
जैनांची नगरीवरून नरेंद्र मेहतांचा माफीनामा X / IANS च्या व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
Published on: 

भाईंंदर : मीरा-भाईंदरला ‘जैनांची नगरी’ आणि ‘मिनी राजस्थान’ असा उल्लेख करणाऱ्या भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या वक्तव्यावरून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विविध पक्ष आणि संघटनांकडून निषेध व्यक्त झाल्यानंतर मेहता यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन, आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली.

ठाणे येथे जैन मुनींच्या उपस्थितीत आयोजित पुरस्कार सोहळ्यात मेहता यांचा जैन समाजासाठी केलेल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना त्यांनी मीरा-भाईंदरचा उल्लेख ‘जैनांची नगरी’ असा केला. आपण ज्या मतदारसंघातून निवडून येतो, तेथे सर्व जाती-धर्मांचे नागरिक राहतात. मात्र जैन समाजात जन्म झाल्याचा आपल्याला अभिमान असल्याचे मेहता यांनी नमूद केले. पर्युषण पर्वाच्या काळात आपल्या शाळेत कंदमुळांवर निर्बंध ठेवण्यात आले होते. तसेच जैन साधू अनवाणी चालत असताना त्यांच्या पायांना चटके लागू नयेत म्हणून रस्त्यावर पांढऱ्या पट्ट्या लावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी मेहतांच्या वक्तव्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची आणि पक्षातून हकालपट्टीची मागणी केली. मनसेचे सचिन पोपळे यांनीही मेहतांवर टीका करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसचे सिद्धेश राणे, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते दीप काकडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनीही निषेध व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.| X / IANS

पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण देताना मेहता यांनी मीरा-भाईंदर हे आगरी-कोळी समाजाचे शहर असून ते तसेच राहणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्राने आणि मराठी माणसांनी आपल्याला खूप काही दिले असून, आपल्या वक्तव्यामुळे कोणत्याही समाजाच्या किंवा धर्माच्या भावना दुखावल्या असतील तर आपण माफी मागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मीरा-भाईंदर हे आगरी-कोळी समाजाचे शहर आहे आणि ते तसेच राहील. आपल्या वक्तव्याचा उद्देश कोणत्याही समाजाच्या भावना दुखावण्याचा नव्हता. तसेच मराठी समाजाने आपल्याला निवडून दिल्याची जाणीव असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नरेंद्र मेहता, आमदार भाजपा

logo
marathi.freepressjournal.in